दापोली : स्त्रीशक्तीचा सन्मान आणि महिला सबलीकरणाच्या जनजागृतीसाठी दापोलीकरांनी आज सायकल फेरी काढली.
दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या आपल्या आई, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रीण, शिक्षिका इत्यादींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचा गौरव, सन्मान करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे आज सायकल फेरी काढण्यात आली. सायकल चालवण्याचे अनेक फायदे नागरिकांना पटवून देणे हाही या फेरीचा उद्देश होता. दापोलीच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे योगदान असलेल्या अनेक आदरणीय महिला या सायकल फेरीमध्ये सहभागी झाल्या होत्या.
दापोलीच्या आझाद मैदानातून सुरू झालेली ही फेरी उपजिल्हा रुग्णालय, एसटी आगार, पोलीस ठाणे, बाजारपेठ, पोस्ट ऑफीस, शिवाजीनगर, नवभारत छात्रालय मार्गे सहा किलोमीटरचा प्रवास करून पुन्हा आझाद मैदानावर आली. मार्गावरील ठिकठिकाणी महिलांचा सन्मान करण्यात आला. विचारे प्रॉडक्ट महिला गृह उद्योग कारखान्याला भेट देऊन तेथील आधुनिक तंत्रज्ञान मशीन्सबद्दल माहिती जाणून घेतली. दापोली उपजिल्हा रुग्णालयातील परिसेविका घाग, जाधव, डॉक्टर, कर्मचारी, दापोली पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक ज्योती चव्हाण, मंजूश्री पाडावे आणि महिला पोलीस, एसटी आगार व्यवस्थापक रेश्मा मधळे, व्यावसायिक उद्योजिका माधुरी विचारे, अर्पिता मालू, वैशाली मेहता, श्रद्धा गायकवाड, नेहा तोडणकर, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील स्मिता सुर्वे, रितू मेहता, संजीवनी कदम, सारिका तलाठी, वर्षा गोरिवले, डॉ. मानसी फाटक, डॉ शुभांगी फाटक, डॉ आनंदी सावंत, जयश्री खानविलकर, सुजाता प्रधान, योगसाधक अक्षदा साळवी, स्नेहा भाटकर तसेच भाजीविक्रेत्या, प्रगतिशील शेतकरी, गृहिणी अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा गौरव करण्यात आला. समाजासाठी करत असलेल्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
अनेक महिलांनी सायकल फेरीमध्ये सहभाग घेऊन सोबत सायकल चालवली. नागरिकांनी खाऊ, चिक्की, लाडू, कॅडबरी, पाणी, सरबत देऊन सायकल फेरीचे स्वागत केले.
या सायकल फेरीचे नियोजन करण्यात केतन पालवणकर, अंबरीश गुरव, उत्तम पाटील, पराग केळसकर, अमोद बुटाला, संदीप भाटकर, सत्यवान दळवी, संजय पिंगळे इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली.










कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

