Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

पर्यटन परिषदेचे फलित

Advertisements

कोकणाच्या विकासासाठी पर्यटन हा उत्तम पर्याय असू शकतो, असे सातत्याने सांगितले जाते. त्यासाठी मुंबई आणि कोकणात पर्यटनाच्या परिषदा भरत असतात. त्यामध्ये मोठे विचारमंथन होते. आराखडे काढले जातात. त्याची अंमलबजावणी वेळच्या वेळी झाली असती, तर पर्यटनातील पायाभूत सुविधांसाठी परिषदा भरविण्याची वेळच आली नसती. आजवरच्या परिषदांचे निष्कर्ष अगदीच नकारात्मक नसले, तरी खूप सकारात्मक आहेत, असेही नाही. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत अलीकडेच झालेल्या शाश्वत पर्यावरण परिषदेचा विचार करता येईल. गेली पाच वर्षे ही पर्यटन परिषद भरत आहे. पर्यटनाबाबत काहीतरी झाले पाहिजे असे वाटणारे जे अनेक कार्यकर्ते आहेत, त्यापैकी राजू भाटलेकर एक आहेत. त्यांच्याच रत्नागिरी पर्यटन सेवा सहकारी संस्थेतर्फे या परिषदा भरविल्या जात आहेत. पहिल्या चार वर्षांच्या परिषदांमध्ये पर्यटनाचे पर्यटनाच्या विकासाचे अनेक मुद्दे मांडले गेले असले तरी पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र आले पाहिजे, रस्त्यांसारख्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत आणि आपला व्यवसाय वाढविला पाहिजे, या विचारापलीकडे त्यातून फारसे काही निष्पन्न झाल्याचे दिसत नाही. यावर्षीची परिषद मात्र काहीशी वेगळी ठरली, असेच म्हणावे लागेल. कारण याच परिषदेत अनाहूतपणे मांडल्या गेलेल्या एका मुद्द्यावर एकदम एक कोटीच्या निधीची घोषणा झाली. तेच या परिषदेचे फलित होते.

राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ही मुंबईतील अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणारी एक सामाजिक संस्था आहे. या दोन तालुक्यांमधील मुंबईत राहणारे चाकरमानी एकत्र येऊन त्यांनी गावाच्या विकासासाठी ही संस्था स्थापन केली आहे. वर्षानुवर्षे दोन तालुक्यांच्या विकासाच्या दृष्टीने अनेक उपक्रम संस्था मुंबईत आणि कोकणातही राबवत आहे. गेली आठ वर्षे या संस्थेतर्फे अनोखे ग्रामीण साहित्य संमेलन भरविले जाते. कोकणातील आणि प्रामुख्याने या दोन तालुक्यांमधील अप्रकाशित व्यक्ती, संस्था, लोककला, परंपरांना उजेडात आणण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी संस्था काम करत असते. लांजा तालुक्यातील माचाळ गाव थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. पण ते तसे उपेक्षित राहिले आहे. हे गाव पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी या संस्थेने प्रयत्न चालविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्थानिक लोककलांचा महोत्सव तेथे भरविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी रत्नागिरीतल्या पर्यटन परिषदेत दिली. त्यांचे निवेदन ऐकल्यानंतर परिषदेचे प्रमुख पाहुणे सिंधुरत्न समृद्धी योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य प्रमोद जठार यांनी त्या गावाविषयीची माहिती करून घेतली आणि ताबडतोब एक कोटी रुपयांचा निधी या गावाच्या पर्यटन विकासासाठी देणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार आता ती संस्था कामाला लागली आहे. आराखडा तयार केला जाणार आहे. जाहीर झालेला निधी उपयोगात आणला जावा, यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. पर्यटन परिषदेत मांडल्या गेलेल्या एखाद्या मुद्द्यावर तातडीने निर्णय होण्याची ही पहिलीच वेळ आहे. योग्य पद्धतीने आपली मागणी मांडणारे कार्यकर्ते आणि त्याची दखल घेऊन तातडीने निधी जाहीर करणारे नेते हे दोघेही अभिनंदनास पात्र आहेत

एक कोटीच्या निधीच्या घोषणेचे पुढे काय होणार आहे, निधीचे वितरण कसे होणार आहे, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, असे सारे प्रश्न आहेतच. पण राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या नेतृत्वाची कळकळ आणि कार्यकर्त्यांची धडपड लक्षात घेतली तर माचाळच्या विकासाचा आराखडा तयार होईल आणि निधी मिळून तो पूर्णत्वाला जाईल, यात शंका वाटत नाही.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version