पर्यटन परिषद झाली; पण रत्नागिरी अपरिचितच!

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. सभा-संमेलने, समारंभ होऊ लागले आहेत. कोकणाशी संबंधित असलेल्या पर्यटन या लाडक्या विषयावरची अशीच एक परिषद रत्नागिरीत झाली. अपरिचित रत्नागिरी असा या परिषदेचा विषय होता, पण हा विषय फलकावरच्या नावापुरताच राहिला. हे प्रकर्षाने जाणवले. एखाद्या भाषणाचा अपवाद वगळला, तर अपरिचित रत्नागिरीचा कोठेच उल्लेख झाला नाही. परिषदेत मांडले गेलेले मुद्दे नुसते परिचित नव्हते, तर अतिपरिचित होते. साहजिकच या मुद्द्यांची अवज्ञा झाली, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

आतापर्यंत अशा कित्येक परिषदा झाल्या वयोमानानुसार आयोजक वेगळे, पक्ष वेगळे, संघटना वेगवेगळ्या. निष्कर्ष एकच- “प्रतिवार्षिकविहितं” परिषद व्हायलाच हवी! काही जणांची हौस असते, काही जणांना राजकीय भवितव्याच्या दृष्टिकोनातून उभे राहायचे असते, काहीजण मात्र तळमळीने असे कार्यक्रम आयोजित करतात. पण त्यांची तळमळ फारसे काही निष्पन्न न झाल्यामुळे मळमळच ठरते. तसेच यावेळच्या परिषदेचेही झाले आहे. व्यासपीठावरची मंडळी तज्ज्ञ होती, यात शंकाच नाही. त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचाही समावेश होताच. दरवर्षीच्या वेगवेगळ्या परिषदांमध्ये बदलून आलेले नवे अधिकारी हजेरी लावतात आणि तेच ते आणि तेच ते गुळगुळीत झालेले मुद्दे हिरीरीने मांडत असतात. रस्ते गुळगुळीत झाले पाहिजेत असे म्हणत खड्ड्यांच्या रस्त्यांमधूनच ते परिषदेच्या ठिकाणी पोहोचत असतात. याशिवाय पर्यटनाच्या परिषदेत वेगळे मुद्दे आलेच नाहीत. काय झाले पाहिजे, हे सांगितले जाते पण प्रत्येक परिषदेत तेच ते सांगितले जाते. कारण परिषदा कितीही झाल्या, तरी पुढची परिषद होईपर्यंत त्यातला एकही मुद्दा मार्गी लागलेला नसतो. रस्ते आणि मार्गदर्शक फलकांच्या बाबतीत तर पूर्वीपेक्षा पुढच्या वेळची स्थिती आणखी दयनीय झालेली असते. कोकण मुळातच सुंदर असल्यामुळे त्याच्या सौंदर्याचे गोडवे कुठल्याही व्यासपीठावरून गायिले जातात. पर्यटन परिषदेत तर ते गायिले जाणारच. तसेच ते या वेळेच्या अपरिचित रत्नागिरी पर्यटन परिषदेतही गायिले गेले. पण त्यापुढे पाऊल पडण्याची शक्यता नाही. परिषदेत जे मुद्दे मांडले गेले, त्यावरून नजर फिरविली तरी बोलणाऱ्या व्यक्तींची नावे फक्त बदलली आहेत, बाकी मुद्दे तेच आहेत, याची खात्री पटेल.

साहसी पर्यटन, सागरी पर्यटन, निसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन, कोकणात अलीकडे मूळ धरू पाहत असलेले कातळशिल्प पर्यटन असे कितीतरी प्रकार सांगितले जातात. पण त्या त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात एखादे गाव किंवा एखादे क्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीने उभे केले, तर तो एक आदर्श ठरेल. त्यादृष्टीने निश्चित आराखडा तयार केला जात नाही. जे काही सांगितले जाते, ते संपूर्ण कोकणासाठी असते. कोकणासाठी म्हणून जेव्हा हे मुद्दे मांडले जातात, तेव्हा मोठ्या आर्थिक तरतुदीची गरज असते. ती एकाच वेळी पूर्ण होण्याची शक्यताच नसते. त्याकरिता शासनावर अवलंबून राहावे लागते. यासाठी मॉडेल म्हणून एखादे गाव, एखादे शहर, एखादा विभाग निवडून त्यावर काम केले गेले पाहिजे. पूर्ण कोकणासाठी म्हणून कितीही मुद्दे अशा परिषदांमधून मांडले गेले तरी ते परिचितच असणार आहेत. त्यात काहीही अपरिचित असणार नाही. कारण मुळातच त्यात फारशी सुधारणा होत नाही. त्यामुळे परिषदेत अपरिचित मुद्दे असण्याची शक्यताच नाही.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १ ऑक्टोबर २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा १ ऑक्टोबरचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply