माचाळच्या शेतकऱ्यांना पावसाळी बीबियाण्यांचे मोफत वाटप

लांजा : माचाळ मुचकुंदी पर्यटन विकास सेवा सहकारी संस्थेने माचाळ गावातील शेतकऱ्यांना पावसाळी भाजीपाल्याचे नऊ प्रकारचे बीबियाणे पुरविले. त्याचे वितरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विवेकराव सावंत आणि खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत झाले.

माचाळ (ता. लांजा) हे रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. या गावाच्या पर्यटन विकासाठी स्थापन झालेल्या माचाळ मुचकुंदी पर्यटन विकास सेवा सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विवेक सावंत माचाळ गावात सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. यापूर्वी त्यांनी करोनाच्या काळात जीवनावश्यक वस्तू आणि किराणामाल ग्रामस्थांना पुरविला होता. करोनाच्या काळात उपयुक्त औषधे, ऑक्सीमीटर दिले होते. पावसाळ्यात गावासाठी कोकण कॄषी विद्यापीठाच्या सहाय्याने भाजीपाल्याच्या मिनिकीट वाटप केले होते. आजही त्यांनी गावात होळीनिमित्ताने भेट दिली असता पावसाळ्यापूर्वीची तयारी म्हणून बीबियाण्यांचे वाटप केले. त्यामध्ये नऊ प्रकारची बियाणे आहेत. लोकांनी परसबागेत भाजीपाला करावा आणि आपली स्वतःची गरज भागवून उरलेला विक्री करावा, असा संस्थेचा उद्देश आहे. यावेळी भेंडी, भोपळा, मुळा, शिराळी, वांगी, पालक, मिरची, चवळी आणि घेवडा अशा नऊ प्रकारच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी आपले विचार व्यक्त करताना श्री. सावंत म्हणाले की, गावात रस्ता आला म्हणजे विकास नव्हे. त्या रस्त्यावरून दूध, भाजीपाला, अंडी यांची गावातून बाहेर वाहतूक आणि विक्री होईल, शेतकरी सधन होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने विकास झाला असे म्हणता येईल.

खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले, माचाळ गावच्या विकासाची आता सुरुवात झाली आहे. माचाळ गावात तीन वर्षांपूर्वी मी आलो होतो, तेव्हा अतिशय बिकट अवस्था होती. आज परिस्थिती सुधारली असली तरी रस्त्याचे डांबरीकरण, गावात पाणीपुरवठाही सुरू करायचा आहे. माचाळ येथे अन्य पायाभूत सुविधांचा विकास करत असताना स्थानिक भूमिपुत्रांना घेऊन माचाळ पर्यटनाचा आराखडा करण्यात येईल. अधिकाऱ्यांनी माचाळमध्ये केलेले काम कौतुकास्पद आहे. हा रस्ता करणे खूप कठीण होते. आम्ही फक्त निधी आणला, मात्र अण्णा सामंत यांचा अनुभव आणि साहस यामुळेच हा रस्ता पूर्ण झाल्याचे गौरवोद्गार श्री. राऊत यांनी काढले.

गावात ७० वर्षांनंतर रस्ता झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी श्री. राऊत यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, उद्योजक रवींद्र सामंत, किरण सामंत, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, विवेक सावंत, सभापती जया माने आदी उपस्थित होते.

समारंभात विवेकराव सावंत यांनी व्यक्त केलेले विचार पाहण्यासाठी पाहा सोबतचा व्हिडीओ

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply