असा अनुभवला कर्णेश्वराचा किरणोत्सव

कसबा-संगमेश्वर (ता. संगमेश्वर) येथील कर्णेश्वराच्या मंदिरात १५ मार्च रोजी सकाळी किरणोत्सव झाला. त्याविषयी…
…..

गेल्या वर्षी मार्च महिन्यातील गोष्ट… आमच्या गावात राहणारे गजेंद्र देशमुख नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करून घरी जाताना कर्णेश्वर मंदिरात आले आणि त्यांना जे दृश्य दिसले ते डोळे दिपवून टाकणारे होते. कर्णेश्वराच्या गाभाऱ्यातील शिवपिंडी सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजळून निघाली होती. त्यांनी आपल्या मोबाइलमध्ये त्याचे भराभर फोटो काढले. तो दिवस होता १६ मार्च २०२२ आणि सकाळचे सव्वासात वाजले होते. त्यांनी ते फोटो मला पाठवले, मी जर चुकत नसेन तर गेल्यावर्षी ते फोटो सोशल मीडियावर मी शेअर केले होते.

यावर्षी ७ मार्चला आमच्याकडची होळी होती, त्यादिवशी परत गजेंद्र देशमुख यांनी मला आठवण केली… “किरणोत्सवाचा दिवस जवळ आलाय हा…”

… आणि मग मी ९ मार्चपासून रोज सकाळी कर्णेश्वर मंदिरात येऊन किरणोत्सवाची वाट पाहू लागलो. पण १०-११ तारखेला सूर्यकिरणे शिवपिंडीवर न पडता उजव्या बाजूला साळुंकीवर पडलेली दिसली. तेव्हा मला एकदा वाटले की बहुतेक आपला यावर्षीचा मुहूर्त चुकला… किरणोत्सव होऊन गेला.

मी गेल्या वर्षी १६ मार्चला कुठली तिथी होती ते काढून पाहिले, तर त्या दिवशी फाल्गुन शुद्ध त्रयोदशी होती असे लक्षात आले आणि १० मार्चला तर फाल्गुन वद्य तृतीया होती. मग विचार आला की इंग्रजी तारखेप्रमाणे होते का तेही पाहू… त्यामुळे त्यापुढील दोन-तीन दिवससुद्धा येण्याचे नक्की झाले. १४ तारखेला काही कारणामुळे मला येता आले नाही, पण माझी पत्नी सौ. सोनाली सकाळी मंदिरात आली आणि तिने फोटो काढले. जवळजवळ ९५ टक्क्यांहून अधिक शिवपिंडीवर किरणांचा अभिषेक झाला होता आणि मग खात्री झाली की उद्या नक्की किरणोत्सव होणार.

… आणि म्हणून माझ्या सोशल मीडिया अकाउंटवरून तसे मी जाहीर केले. अगदी खरे सांगायचे, तर पोटात भीती होतीच… आपण जाहीर केले आहे आणि तसे नाही झाले तर….? कारण १४ तारखेची पोस्ट बऱ्यापैकी फिरल्यामुळे त्याची प्रसिद्धी झाली होती. रात्रीसुद्धा देवरूख, कोळंबे या भागातून फोन आले.

फार प्रसिद्धी केली नाही तरीही आज सकाळी सुमारे २५-३० जण पावणेसातच्या दरम्यान मंदिरात आले होते. सूर्योदय होवून गेला तरी भास्कराचा पत्ता नाही तेव्हा परत धास्ती वाटू लागली. पण आज सकाळी थोडे मळभ होते. त्यामुळे सूर्यनारायणाचे दर्शन व्हायला नेहमीपेक्षा थोडा अधिक वेळ लागला … पण अखेर तो आलाच आणि आपल्या उगवत्या किरणांनी शिवशंकरांना अभिषेक घालता झाला. ते नयनरम्य दृश्य उपस्थित शिवभक्तांनी आपल्या डोळ्यांत साठवले. सुमारे ७-८ मिनिटे हा सोहळा अनुभवता आला. कर्णेश्वराच्या किरणोत्सवाची आज पहाट झाली. सोशल मीडियावरून अनेकांनी हा शिव-भास्कर भेटीचा अनुपम्य सोहळा अनुभवला..

आता विचारणा होऊ लागली… आज पुण्याहून एका व्यक्तीचा मेसेज आला की पुढील वर्षी थोडे आधी कळवा, म्हणजे येण्याचे नियोजन करता येईल. किरणोत्सवाचा उत्सव होण्याची ही नांदी ठरावी.

आता उत्तरायणाप्रमाणे हीच क्रिया दक्षिणायनामध्येसुद्धा होणार… त्याचे नक्की दिवस कोणते असतील? त्याचा शोध घेऊ… पुण्याचे प्राच्यविद्या अभ्यासक आशुतोष बापट यांच्या सोबत चर्चा करून त्याही प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
आज बापट सरांसोबत चर्चा करताना त्यांनी उच्चारलेले एक वाक्य महत्वाचे आहे. ते म्हणाले, “यंदा तुम्ही कर्णेश्वर महोत्सव यशस्वी केलात… कर्णेश्वर महादेव म्हणाले, अजूनही माझे अनेक उत्सव तुमच्या निदर्शनास आणून देईन….”

शिवशंकरांचा हा प्रसादरूपी आशीर्वाद आहे, असे मानून या खगोलशास्त्र, स्थापत्यशास्त्र आणि धार्मिकता या त्रिवेणी संगमाकडे पाहिले, तर असे अनेक पैलू आपल्याला या ठिकाणी आढळतील हे नक्की…. तो कारुण्यसिंधू आपल्याकडून हे सोहळे घडवून आणत असतो. त्या करुणाकराला वंदन करूया, ज्यांना आज हा सोहळा अनुभवता आला नसेल, त्यांनी १६ मार्च रोजी याचा नक्की लाभ घ्यावा. अजून उद्याचा एक दिवस नक्की ही स्थिती अनुभवता येईल. त्या शिव-भास्कराच्या तेजोमय भेटीने आपल्या जीवनातील अंधकार नाहीसा होवो हीच प्रार्थना…

  • निबंध कानिटकर, संगमेश्वर
    (संपर्क – ९४२२३७६३२७)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply