Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

स्वराभिषेकतर्फे रत्नागिरीत रविवारी लक्ष्मण गाड स्मृती संगीत सभा

Advertisements

रत्नागिरी : मुंबईतील प्रतिभावान युवा गायक साहिल भोगले यांच्या सुरेल शास्त्रीय गायनाने यावर्षीची लक्ष्मण गाड स्मृती संगीत सभा येत्या रविवारी (दि. २१ मे) रत्नागिरीत रंगणार आहे. येथील स्वराभिषेक संस्थेतर्फे मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वराभिषेक संगीत वर्गाच्या संचालिका सौ. विनया परब यांचे वडील गोव्यातील प्रसिद्ध भजनी मास्तर लक्ष्मण गाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी या संगीत सभेचे आयोजन केले जाते. यावर्षी मैफल रंगवणारे कलाकार साहिल भोगले पं. निषाद बाक्रे यांचे शिष्य आहेत. त्यांनी भारतातील अनेक शास्त्रीय गायन स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक पटकावले आहे. यामध्ये आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव, पं. व्ही. डी. पलुस्कर शास्त्रीय संगीत स्पर्धा, गांधर्व महाविद्यालय आयोजित स्पर्धा, स्वर साधना समिती, दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र आदी स्पर्धांचा समावेश आहे.

त्यांच्या रत्नागिरीतील मैफलीसाठी गोपीनाथ गवस (गोवा) संवादिनीसाथ करणार आहेत. ते गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार व कला अकादमीची संगीत कुशल पदवी प्राप्त कलाकार आहेत. त्यांचे प्राथमिक संवादिनीचे शिक्षण त्यांचे वडील अर्जुन गावस यांच्याकडे झाले. गेली दहा वर्षे गोव्याती भारतीय संगीत आणि नृत्य विभाग कला अकादमीमध्ये प्रा. सुभाष फातर्पेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची पुढील तालीम सुरू आहे. त्यांना राया कोरगावकर यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. सध्या ते गोवा कॉलेज ऑफ म्युझिकमध्ये संवादिनी शाखेत सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

तबला साथ करणारे सूरज मोरजकर (गोवा) यांचे तबल्याचे शिक्षण गुरुवर्य दिगंबर गाड यांच्याकडे झाले. त्यानंतर गोवा संगीत महाविद्यालयात स्वर्गीय मयूरेश वस्त यांचे मार्गदर्शन लाभले. पं. उल्हास वेलिंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली तबल्याची बीपीए पदवी प्रथम श्रेणीत पूर्ण असून पं. वेलिंगकर सर आणि अमर मोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली एमपीए पदवी प्राप्त केली आहे.

रविवारी सायंकाळी ६ वाजता रत्नागिरीच्या शिर्के प्रशालेच्या सौ. विजयालक्ष्मी मलुष्टे रंजन मंदिर रंगमंचावर हा कार्यक्रम होणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य आहे. संगीतरसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version