शास्त्रीय गायनाने रंगली लक्ष्मण गाड संगीत सभा

रत्नागिरी : गोव्यातील प्रसिद्ध भजनी मास्तर लक्ष्मण गाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित संगीत सभेत मुंबईतील प्रतिभावान युवा गायक साहिल भोगले यांच्या सुरेल शास्त्रीय गायनाने रत्नागिरीकर रसिक मंत्रमुग्ध झाले.

येथील स्वराभिषेक संस्थेतर्फे आयोजित हा कार्यक्रम शिर्के प्रशालेच्या रंजनमंदिर रंगमंचावर पार पडला.

(कै.) लक्ष्मण गाड यांच्या कन्या आणि स्वराभिषेक संस्थेच्या संचालिका विनया परब वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी या संगीत सभेचे आयोजन करतात. यावर्षी पं. निषाद बाक्रे यांचे शिष्य साहिल भोगले यांनी ही मैफल रंगवली. मारवा रागातील बडा ख्यालाने मैफलीला प्रारंभ झाला. त्यानंतर हमीर आणि शहाणा कानडा रागातील बडा ख्याल तसेच छोटा ख्याल अतिशय कसदार आवाजात साहिल यांनी सादर केले. अवघे गरजे पंढरपूर या अभंगाने मैफलीची सांगता झाली.

मैफलीसाठी गोपीनाथ गवस (गोवा) यांनी संवादिनीसाथ, सूरज मोरजकर (गोवा) यांनी तबलासाथ तर तन्वी मोरे आणि धनश्री दरडी यांनी तानपुरासाथ केली. दीप्ती आगाशे यांनी निवेदन केले, तर राकेश बेर्डे यांनी उत्तम ध्वनिसंयोजन केले. यावेळी अॅड. प्रा. राजशेखर मलुष्टे, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे मनोज पाटणकर, व्हायोलिनवादक नितीन देशमुख, सुनीता पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

लक्ष्मण गाड स्मृती संगीत संगीत सभेत शास्त्रीय गायन करताना साहिल भोगले. सोबत संगीतसाथीला सूरज मोरजकर (तबला), गोपीनाथ गवस (संवादिनी), तन्वी मोरे आणि धनश्री दरडी (तानपुरा)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply