कोकण रेल्वेवरील वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक निश्चित

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील मुंबई सीएसएमटी-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. शुक्रवार वगळता ही गाडी धावणार आहे.

मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारत गाडीला येत्या शनिवारी, ३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगाव येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर ५ जूनपासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होईल. या गाडीचे मुंबई ते मडगावचे एसी चेअर कार तिकीट सुमारे १,५८०, तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी २,८७० रुपये आकारले जाण्याची शक्यता आहे.

याबाबत रेल्वे बोर्डाला मुंबईच्या मुख्य परिचालन प्रबंधक कार्यालयाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, या गाडीची १७ मे रोजी झालेली चाचणी यशस्वी झाली आहे. ही गाडी शुक्रवार वगळता इतर दिवशी दररोज चालविता येऊ शकेल. त्याकरिता वेळापत्रकही देण्यात आले आहे.

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिवी येथे थांबे असतील. सध्या या गाडीचे वेळापत्रक पावसाळी वेळापत्रकानुसार निश्चित करण्यात आले आहे. मुंबई ते मडगाव हे ५८६ किलोमीटरचे अंतर ही गाडी ताशी सुमारे ७५ किलोमीटर वेगाने ७ तास ५० मिनिटांत पार करेल. पावसाळा संपल्यानंतर या वेळापत्रकात आणि प्रवासाच्या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून शुक्रवार वगळता इतर दिवशी ही वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी ५.२५ वाजता सुटेल. इतर स्थानकांचे वेळापत्रक असे – ठाणे ५.३२, पनवेल ६.३०, रोहा ७.३०, खेड ८.२४, रत्नागिरी ९.४५, कणकवली ११.२०, थिवी दुपारी १२.२८, मडगाव दुपारी १.१५.

परतीच्या प्रवासाकरिता ही गाडी मडगाव येथून दुपारी २.३५ वाजता सुटेल. गाडीचे इतर स्थानकांचे वेळापत्रक असे – थिवी ३.२०, कणकवली ४.१८, रत्नागिरी ५.४५, खेड सायंकाळी ७.०८, रोहा रात्री ८.२०, पनवेल ९.००, ठाणे ९.३५, दादर १०.०५, मुंबई १०.३५.

गाडी आठ डब्यांची असेल.

गाडीच्या चाचणीचा व्हिडीओ सोबतच्या लिंकवर –

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

Leave a Reply