रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीचे औचित्य साधून येथील नटराज नृत्यवर्गातर्फे ‘अनादि मी अनंत मी’ या कार्यक्रमाद्वारे नृत्यपुष्पांजली अर्पण केली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्ताने रत्नागिरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नटराज नृत्यवर्गाच्या संचालिका सोनम जाधव यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यांवर आधारित साकारलेला ‘अनादि मी अनंत मी’ हा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम येथील रंजन मंदिरात २८ मे रोजी पार पडला. सोनम जाधव आणि त्यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या स्वातंत्र्यवीरा तुझी आरती या वंदनेने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर धगधगले अग्निकुंड, सदया गणया तार, जयदेव जयदेव जयजय शिवराया, आर्यबंधू हो उठा उठा, अनादि मी अनंत मी, ने मजसी ने परत मातृभूमीला, निरंजनासी निरांजनाला, तुम्ही आम्ही सकल हिंदू, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, शस्त्रगीत, जयोsस्तुते अशा एकाहून एक सुंदर रचना सादर झाल्या.
प्रसिद्ध निवेदक निबंध कानिटकर यांनी प्रत्येक गीतादरम्यान सावरकरांचे जीवनचरित्र आणि त्यांचे विचार रसिकांसमोर उलगडले. तात्याराव सावरकरांनी वहिनीला लिहिलेले जयासी तुवा प्रतिपाळिले हे काव्यात्मक पत्र तन्वी मोरे हिने गायले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कलाकारांनी एकत्र येऊन रसिकांना मानवंदना दिली, तेव्हा तुडुंब भरलेल्या सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतमातेचा जयघोष रसिकांनी केला आणि सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात सर्व कलाकारांचे कौतुक केले.
आराध्या साउंडचे सुरेंद्र गुडेकर, ऋषीकेश कुवळेकर आणि राज शिंदे यांनी उत्तम ध्वनिसंयोजन तसेच प्रकाशयोजना केली. पालकांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला संगीत शिक्षक विजय रानडे, पोलीस निरीक्षक निशा जाधव, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, नृत्यगुरू शिल्पा मुंगळे, आविष्कार संस्थेच्या सुप्रिया लाड, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी मनोज पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. नृत्यवर्गातर्फे सावरकरांचे पुस्तक आणि पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.



कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

