रत्नागिरीत शनिवारी लक्ष्मण गाड स्मृती शास्त्रीय संगीत महोत्सव

रत्नागिरी : येथील स्वराभिषेक संस्थेतर्फे शनिवारी (दि. ७ मे) कै. लक्ष्मण नारायण गाड स्मृती संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात रत्नागिरीतील उदयोन्मुख गायिका तन्वी मंगेश मोरे, ज्येष्ठ गायक प्रसाद गुळवणी यांचे शास्त्रीय गायन आणि गोव्यातील डॉ. उदय कुलकर्णी यांचे सोलो तबलावादन होणार आहे.

तन्वी मोरे

स्वराभिषेक-रत्नागिरी संस्थेच्या संचालिका सौ. विनया विराज परब यांनी त्यांचे वडील भजनी मास्तर लक्ष्मण गाड यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ही संगीत मैफल आयोजित केली आहे. मैफलीतील कलाकार तन्वी मोरे वयाच्या आठव्या वर्षापासून सौ. विनया परब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेत आहे. तिने विविध शास्त्रीय, सुगम गायन स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. आर्ट सर्कल आयोजित स्वरभास्कर बैठकीतही तिने शास्त्रीय गायन केले. याशिवाय तन्वीने मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्यगीत स्पर्धेत तृतीय पारितोषिक, देवरूख येथील स्वरानंद गीतगायन स्पर्धेत प्रथम पारितोषिक, यज्ञेश प्रबोधिनीच्या राज्यस्तरीय नाट्यगीत स्पर्धेत द्वितीय, स्वामी स्वरूपानंद मंदिरच्या अभंग गायन स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम व राज्यात द्वितीय पारितोषिक, दादर-माटुंगा कल्चरल सेंटरच्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत तृतीय पारितोषिक पटकावले आहे.

प्रसाद गुळवणी

शास्त्रीय गायक कलाकार प्रसाद गुळवणी रत्नागिरी आकाशवाणीचे प्रथम श्रेणीचे कलाकार असून त्यांचे गायनाचे प्राथमिक शिक्षण वडील मधुकर गुळवणी आणि नागपूरचे प्रभाकर देशकर यांच्याकडे झाले. कोलकाता येथे त्यांनी जयपूर घराण्याचे पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने तालीम घेतली आहे. गुळवणी यांचे मुंबई ,पुणे, कोल्हापूरसह अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले आहेत. रत्नागिरीत त्यांनी अनेक शिष्य घडवले आणि घडवत आहेत.

उदय कुलकर्णी

तबला सोलो वादन करणारे डॉ. उदय कुलकर्णी (गोवा) गोवा संगीत महाविद्यालयात तबला विषयाचे प्राध्यापक आहेत. ते धारवाड येथील पंडित एच. सोमशेखर यांचे शिष्य असून त्यांना पं. रवींद्र यावगल, पं. सूरज पुरंदरे, रचय्या हिरेमठ, पं. वामनराव मिरजकर, पं. सुरेश सामंत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांनी पद्मभूषण एन् राजम, पद्मश्री पं. वेंकटेश कुमार, पं. जयतीर्थ मेवुंडी, पं. रोणू मुजुमदार यांच्यासह अनेक दिग्गजांना साथसंगत केली आहे. कुलकर्णी यांनी तबला विषयात पीएच. डी. संपादन केली आहे.

या कलाकारांना गोव्याचे दत्तराज म्हाळशी, रत्नागिरीचे महेश दामले आणि वरद सोहनी हार्मोनियमसाथ, तर गोव्याचे अमर मोपकर आणि रत्नागिरीचे केदार लिंगायत तबलासाथ करणार आहेत. मैफलीसाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्य लाभले आहे. शहरातील शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर रंगमंचावर शनिवारी सायंकाळी चार वाजता होणारी ही मैफल सर्वांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त रसिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सौ. विनया परब यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply