उपचारापुरता महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र राज्याचा बासष्टावा वर्धापन दिन १ मे रोजी साजरा झाला. त्याला उत्साहात असे विशेषण एक प्रथा म्हणून लावावे लागेल. पण प्रत्यक्षात त्यात कोणताच उत्साह कोठे दिसला नाही. महाराष्ट्र दिनानिमित्ताने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय ध्वजवंदन नेहमीच्या पद्धतीने पार पडले. पालकमंत्री या समारंभाला उपस्थित असतात. त्यानुसार ठरीव आणि गुळगुळीत पद्धतीने कार्यक्रम पार पडला. रत्नागिरीतही तो त्याच पद्धतीने साजरा झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी शिरस्त्यानुसार ध्वज फडकावला आणि नेहमीच्याच शिरस्त्यानुसार भाषण केले. तेही अर्थातच ठरीव साच्याचे होते. त्यात कोणतेही नावीन्य नव्हते. उत्साह नव्हता. त्यांच्या भाषणावर सहज नजर फिरवली, तर ते कोणाच्याही लक्षात येईल.

जिल्ह्यात पर्यावरण संतुलन आणि औद्योगिकीकरणातून शाश्वत विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. पण त्यासाठी त्यांनी कोणतीही नवी योजना किंवा नवी कल्पना जाहीर केली नाही. राजापूर तालुक्यातील नियोजित आणि वादग्रस्त रिफायनरीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. त्याचा साधा उल्लेखही त्यांनी केला नाही. रिफायनरी हानिकारक आहे, असे पालकमंत्री प्रतिनिधित्व करत असलेल्या शिवसेनेचे म्हणणे आहे. अशा स्थितीत पर्यावरणाची हानी न करणाऱ्या तरीही विकास साधणाऱ्या अशा एखाद्या उद्योगाविषयी त्यांनी सूतोवाच केले नाही. गेल्या दोन वर्षांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात करोनाचे पालुपद म्हणावेच लागते. ते पालकमंत्र्यांनी म्हटलेच. त्याला पूरक म्हणून लसीकरणाची आकडेवारी वाचून दाखवली. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. संपला तो विषय! याच दोन वर्षांमध्ये तौक्ते आणि निसर्ग या दोन चक्रीवादळांनी कोकणाला नेस्तनाबूत केले. या वादळांचा उल्लेख केला नाही, तर काहीतरी अपुरे राहील, याच जाणिवेतून वादळांचा उल्लेख झाला. पण प्रत्यक्षात वादळग्रस्तांना सोसाव्या लागणाऱ्या समस्यांचा ऊहापोह पालकमंत्र्यांनी केला नाही. कारण त्याची मोजदादच झालेली नाही. आपत्तीत सापडलेल्यांना सरकारतर्फे तुटपुंजी मदत झाली. पण ती भरीव होती, अशी सरकारची भूमिका आहे. त्यावर ठाम राहून पुन्हा असे संकट येऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चिपळूणच्या महापुरानंतर तेथील दोन्ही नद्यांमधील गाळ उपसायला शासनाने तातडीने मान्यता दिल्याचे पालकमंत्र्यांनी आवर्जून सांगितले. मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये वैयक्तिकरीत्या लक्ष दिल्याचेही त्यांनी नमूद केले. पण त्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागला, आंदोलन उभारावे लागले, याचा उल्लेख त्यांनी जाणीवपूर्वक टाळला. बचतगटांच्या माध्यमातून बांबू आणि नारळासह मसाल्याची लागवड करण्याचे नियोजन असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. पण शेतीतील नवनवे प्रयोग आणि अधिक माहिती मिळण्यासाठी दापोलीत भरणार असलेल्या सुवर्ण पालवी महोत्सवाचा उल्लेख त्यांना केला नाही. प्रदर्शनाला जाण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करण्याकरिता शासनामार्फत सहलीचे आयोजन करता आले असते. तसे करावेसे त्यांना वाटले नाही. शेतकरी आणि पशुपालकांसाठी असलेल्या किसान क्रेडिट कार्डाची माहिती त्यांनी दिली. पण शेतकरी त्या पतपुरवठा योजनेचा लाभ घेण्यासाठी का पुढे येत नाहीत, त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत, त्या शोधून काढण्यासाठी एखादा उपक्रम राबविता येईल का, याचा विचार पालकमंत्र्यांना सुचला नाही.

एकंदरीत राज्याचा वर्धापन दिन साजरा करताना महाराष्ट्राचा अविभाज्य घटक असलेल्या कोकणासाठी कोणताच निर्धार नाही. जिल्ह्यापुरता एखादा नवा कार्यक्रम पालकमंत्र्यांना देता आला नाही. चेहर्‍यावर उत्साहाचे उसने हसू आणून महाराष्ट्र दिनाचा एक उपचार एकदाचा पार पडला.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ६ मे २०२२)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply