गावखडीत यंदा समुद्री कासवांच्या दोन हजार पिल्लांचं संवर्धन

गावखडी : पावसजवळच्या गावखडीच्या (ता. जि. रत्नागिरी) समुद्रकिनाऱ्यावर गेली सात वर्षं ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या समुद्री कासवांचं संवर्धन केलं जात आहे. यंदाच्या हंगामात (२०२२) गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट म्हणजेच सुमारे २००० पिल्लं समुद्रात सोडण्यात आली आहेत, अशी माहिती गावखडीतले कासवमित्र प्रदीप डिंगणकर यांनी दिली. यंदाचा हंगाम साधारणतः १० मेच्या सुमारास संपण्याची शक्यता आहे. वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली, डिंगणकर यांच्या पुढाकाराने २०१५ पासून गावखडीच्या किनाऱ्यावर कासव संवर्धनाचा उपक्रम राबविला जात आहे. गावखडीतले राकेश सदानंद पाटील आणि सहकाऱ्यांचाही या उपक्रमात सहभाग आहे. (नवजात कासवं समुद्रात सोडतानाचा व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)

सागरी कासवांच्या पाच जातींपैकी ऑलिव्ह रिडले (Olive Ridley) या जातीची कासवं सर्वांत लहान असतात. हीच कासवं महाराष्ट्राच्या म्हणजेच कोकण किनारपट्टीवर (Kokan beach) अंडी घालतात. ही कासवं नामशेष होण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे वेळाससह अन्य ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून या कासवांच्या संवर्धनाचा उपक्रम सुरू आहे. गावखडीत २०१५ पासून हा उपक्रम सुरू झाला. साधारणतः नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत या कासवांच्या माद्या अंडी घालतात आणि समुद्रात निघून जातात. माद्यांच्या चालण्यामुळे तयार झालेल्या खुणांच्या साह्याने त्यांची घरटी शोधली जातात. त्यातली अंडी प्राण्यांनी किंवा माणसांनी खाऊ नयेत, म्हणून किनाऱ्यावर हॅचरीज अर्थात अंडी उबवणी केंद्र तयार करून तिथे ती नैसर्गिक परिस्थितीत ठेवली जातात. अंड्यांतून पिल्लं बाहेर येण्यासाठी ४५ ते ५५ दिवस लागतात. साधारणतः मार्च ते मे हा पिल्लं बाहेर येण्याचा कालावधी असतो.

पिल्लं अंड्यातून बाहेर आल्यानंतर ती त्याच दिवशी संध्याकाळी सूर्य मावळताना किंवा दुसऱ्या दिवशी सूर्य उगवतानाच्या वेळेत समुद्रात सोडली जातात. पिल्लांना नैसर्गिक शत्रू बरेच असल्याने सोडलेल्या पिल्लांपैकी जगून पूर्ण वाढ होणाऱ्या पिल्लांची संख्या केवळ एक-दोन टक्के असते. त्यामुळेच या कासवांचं संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असल्याचं डिंगणकर यांनी सांगितलं. वन विभाग, कांदळवन विभाग आदी सरकारी यंत्रणांचं मार्गदर्शन, सहकार्य लाभतं. गावकऱ्यांचंही सहकार्य असतं; मात्र या कामाची व्याप्ती पाहता अधिकाधिक स्वयंसेवक सहभागी होण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही डिंगणकर यांनी व्यक्त केली.

या परिसरातली कातळशिल्पं, पूर्णगड किल्ला आणि धार्मिक पर्यटनस्थळं आदींचा विचार करून गावात होम स्टेची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले, तर पर्यटकांची संख्या वाढेल आणि त्यांना कासवांच्या पर्यटनासाठीही आणता येऊ शकेल, असं डिंगणकर म्हणाले. त्यामुळे सर्वच ठिकाणच्या आणि प्रकारच्या पर्यटनाचा विकास आणि कासव संवर्धन या दोन्हीला हातभार लागू शकेल.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply