खेड : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. १९ जुलै रोजी सकाळी ११.१५ वाजताच्या स्थितीनुसार, खेड शहरातील जगबुडी नदीने पुराची पातळी ओलांडली असून, खेड शहरात मच्छी मार्केट भागात पुराचे पाणी भरले आहे. तेथील दुकानदार दुकाने बंद करून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत. नारिंगी नदीचे पुराचे पाणी कन्या शाळेजवळ रस्त्यावर आले असल्याने दापोली-खेड रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे. चिपळूण व खेडमधील सर्व शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे.
बोरघर (कातकरी वस्ती) येथील चार घरांना पाणी लागले असल्याने त्या घरांतील २२ जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. मौजे भोस्ते गावातील रस्त्यावर जगबुडी नदीचे पाणी आल्याने भोस्ते-अलसुरे वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याबाबतच्या सूचना अलसुरे येथील मशिदीच्या भोंग्यावरून देण्यात आल्या आहेत.
आंबावली येथील धनगरवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याला भेगा पडल्या असून, रस्त्यावर झाड पडले आहे. खारी गावात पुराचे पाणी येण्याची शक्यता असल्याने शेजारच्या घरातील चार कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. खेड खांबतळे येथील झोपडपट्टीमधील नागरिकांना नगरपालिका बालवाडी शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. जगबुडी नदीच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीमधील नागरिकांना मुकादम हायस्कूलमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

