पतसंस्था नियामक मंडळाच्या तत्काळ नियुक्त्या करा – अॅड. पटवर्धन

रत्नागिरी : पतसंस्थांचे नियमन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नियामक मंडळ सदस्यांची कालमर्यादा संपल्याने नियामक मंडळाचे काम ठप्प झाले आहे. नव्या नियुक्त्या तत्काळ कराव्यात, अशी मागणी राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.

श्री. पटवर्धन यांनी याबाबत सांगितले की, पतसंस्थांच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय करणारे नियमक मंडळ सध्या अस्तित्वात नसल्यासारखी स्थिती आहे. नियमक मंडळावर नियुक्त केलेल्या सदस्यांची मुदत संपली आहे. मात्र नव्याने नियमक मंडळ सदस्यांची नियुक्ती होण्याचे काम शासन स्तरावर गेले काही महिने प्रलंबित आहे. त्यामुळे अनेक धोरणात्मक निर्णय, अर्थकारणातील बदलाशी सुसंगत निर्णय होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे पतसंस्था व्यवस्थेत खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत.

नव्या आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक निर्णय नियमक मंडळ अस्तित्वात नसल्याने गेले काही महिने काही निर्णय होऊ शकलेले नाहीत. तेरा हजारापेक्षा जास्त संख्येने असणाऱ्या नागरी ग्रामीण बिगरशेती पतसंस्था तसेच सहा हजाराच्या घरात असणाऱ्या पगारदार पतसंस्थांमध्ये दोन कोटी ६७ लाख नागरिकांनी केलेली गुंतवणूक ७३ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. तसेच ४५ हजार कोटींपेक्षा अधिक कर्जे या व्यवस्थेच्या माध्यमातून वितरित झाली आहेत. इतकी व्याप्ती आणि निकटता असणाऱ्या या व्यवस्थेसंदर्भात शासनाचे औदासीन्य खटकणारे आहे.

नियामक मंडळ नसल्याने एनपीएसंदर्भातील निर्णय, सीआरएआर संदर्भातील वेटेजचे बदल, कर्जमर्यादा वाढ इत्यादी अनेक निर्णय अडकून पडले आहेत. पतसंस्थांवर निर्बंध आणून पतसंस्थांवर कारवाया करण्यासाठी सजग असणारी यंत्रणा नियामक मंडळाच्या नियुक्तीबाबत इतकी उदासीन का, असा प्रश्न श्री. पटवर्धन यांनी उपस्थित केला आहे.

पतसंस्था म्हणजे जनमानसातील विश्वासार्ह गुंतवणुकीचे साधन आहे. कर्जासाठी पतसंस्था व्यवस्थेवर मोठा वर्ग अवलंबून आहे. गावोगावी, खेडोपाड्यात, शहरी भागात पतसंस्थांचे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे पतसंस्थांच्या आर्थिक सेवांशी मोठा वर्ग जोडलेला आहे. अशा स्थितीत धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता आर्थिक तसेच तांत्रिक निर्णय करण्यासाठी नियामक मंडळ ही संकल्पना अस्तित्वात आली. मात्र अनेक महिने नियामक मंडळ अस्तित्वात नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे.

शासनाने तत्काळ नियामक मंडळ सदस्यांची नियुक्ती करावी आणि नियामक मंडळ स्थापन करावे. पतसंस्थांसंदर्भातील अनेक मुद्द्यांवर निर्णय तात्काळ व्हावेत, अशी मागणी श्री. पटवर्धन यांनी केली असून एका गंभीर विषयाकडे लक्ष वेधले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply