रत्नागिरी : येथील ॲड. इंदुमती श्रेयस मलुष्टे यांची ग्राहक आयोगाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने गुणांच्या गुणवत्तेवर आधारित पदभरती प्रक्रिया राबवली. त्यामध्ये ॲड. मलुष्टे यांची निवड झाली. याबद्दल रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष व पदाधिकारी, सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष व सदस्य अशा एकूण ११२ पदांकरिता शासनाने पदभरती प्रक्रिया राबवली. बहुपर्यायी आणि वर्णनात्मक लेखी परीक्षा (२०० गुण) आणि मुलाखत (५० गुण) अशा एकूण २५० गुणांच्या गुणवत्तेवर आधारित ही प्रक्रिया होती. आयबीपीएसच्या तांत्रिक साह्याने राज्यातील आठ प्रमुख शहरांमधील केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. उमेदवारांची मुलाखत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. आर. श्रीराम यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने घेतली. त्याचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये रत्नागिरीतील ॲड. इंदुमती मलुष्टे यांची जिल्हा आयोगाच्या अध्यक्षपदी आणि ॲड. योगेश खाडिलकर यांची सदस्यपदी शिफारस करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. राज्यातील एकूण १२३० उमेदवारांमधून त्यांनी गुणवत्ता यादीत एकतिसावा क्रमांक पटकावला. रत्नागिरीकरिता ही अभिमानाची बाब आहे, अशा शब्दांत रत्नागिरी बार असोसिएशनने त्यांचे कौतुक केले.
ॲड. मलुष्टे सध्या त्यांचा वकिली व्यवसाय सांभाळत बालन्याय मंडळाच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

