Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रोलर कोस्टर सायक्लोथॉनची रत्नागिरीत जय्यत तयारी

Advertisements

रत्नागिरी : येत्या २९ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीत होणाऱ्या रोलर कोस्टर सायक्लोथॉनची रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे जय्यत तयारी झाली आहे. देशभरातून सायकलप्रेमी रत्नागिरीत येणार आहेत.

रत्नागिरीची ओळख सायकल डिस्ट्रिक्ट ऑफ इंडिया व्हावी, उत्तमोत्तम सायकलपटू तयार व्हावेत, ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ किंवा आशियाई गेम्ससारख्या खेळात सायकलिंगमध्ये भारताने पदकांची लयलूट करावी आणि त्याचबरोबरीने सायकल टुरिझम वाढून सायकलचा उपयोग अर्थार्जनासाठी व्हावा या सुहेतूने कोकणातील दोनशेहून अधिक सदस्यसंख्या असलेला रत्नागिरी सायकलिस्ट क्लब स्थापनेपासूनच कार्यरत आहे.

स्थानिक पातळीवर पंचवीसपेक्षा जास्त उपक्रम घेतलेल्या या क्लबने रोलर कोस्टर सायक्लोथॉन पॉवर्ड बाय हॉटेल विवेकच्या माध्यमातून आपले पुढचे पाऊल उचलले आहे.
दोन वर्षांपूर्वी १७-१८ सायकलप्रेमींपासून सुरू झालेला हा समूह २०० हून अधिक सायकलप्रेमींपर्यंत पोचला आहे.

भाट्ये-गावखडी -भाट्ये दरम्यान होणाऱ्या ४८ किमीच्या रोलर कोस्टलर सायकल स्पर्धेमध्ये भारतभरातून १७५ पेक्षा जास्त सायकलपटू सहभागी होणार आहेत. सर्व स्पर्धकांची राहायची तसेच जेवण व नाश्त्याची व्यवस्था हॉटेल विवेकच्या माध्यमातून करण्यात आली आहे जय हनुमान मित्र मंडळ, आरडीसीसी बँक, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी, हिंद सायकल मार्ट, नंदाई डिजिटल मार्केटिंग, सुवर्णसूर्य फाउंडेशन, आनंदकल्प हॉस्पिटल, विनय रेवडेकर, हॉटेल अलंकार, हॉटेल ब्ल्यू व्ह्यू, राजू घाग, रत्नदुर्ग माउंटेनिअरिंग, वॉकर्स ग्रुप, शीमवोल्टेक प्रायव्हेट लिमिटेड, हॉटेल मिथिला, कवडे हेल्थ क्लिनिक, फ्लेवर्स बेकरी, दीपक पवार अशा प्रयोजकांनी या स्पर्धेला उचलून धरल्यामुळे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा क्लबपुरती मर्यादित न राहता समस्त रत्नागिरीकरांची झाली आहे.
पुरुष ओपन, महिला ओपन, पुरुष ४० ते ५५ आणि पुरुष ५५+ या ४ गटांमध्ये ही स्पर्धा होणार असून जवळपास एक लाख रुपयांची बक्षिसे तसेच आकर्षक चषक विजेत्यांना दिले जाणार आहेत.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबमधील यशवंत ट्रिपल एसआर एसआर अमित कवितके, एसआर शुभम शिवलकर, एसआर अमित पोटफोडे, एसआर अनुप मेहेंदळे, एसआर महेश (बॉबी) सावंत, एसआर ओंकार फडके, एसआर यतीन धुरत, एसआर डॉक्टर नितीन सनगर, एसआर तृणाल येरुणकर तसेच विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या क्लबमधील सायकलिस्टना सन्मानित केले जाणार आहे. रेस अक्रोस अमेरिका स्पर्धेचे विजेते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आणि पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमात गौरवलेले नाशिक येथील डॉक्टर महेंद्र महाजन या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. हॉटेल विवेक इथे झालेल्या या पत्रकार परिषदेला सर्व सत्कारमूर्ती तसेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे दर्शन जाधव, सचिन नाचणकर, विनायक पावसकर, डॉक्टर राज कवडे, प्रसाद देवस्थळी, सुहास ठाकूरदेसाई, केदार देवस्थळी, धीरज पाटकर, योगेश मोरे उपस्थित होते.

रत्नागिरीकरांनी या सायकल स्पर्धेचा थरार अनुभण्यासाठी २९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेपाच वाजता भाट्ये येथे उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version