Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

पस्तीस टक्के अनुदान योजनेचा लाभ उद्योजकांनी घ्यावा : उदय सामंत

Advertisements

रत्नागिरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून कर्ज घेणाऱ्या तरुणांना ३५ टक्के सब्सिडी दिली जाते. तिचा लाभ उद्योजकांनी घ्यावा आणि अधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य करावे, अशी सूचना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली.

येथील उद्योग भवनाचे भूमिपूजन श्री. सामंत यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रात सर्वांत जास्त परकीय गुंतवणूक होऊन राज्य प्रथम क्रमांकावर आले आहे. मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त राज्यात उद्योग भवन उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता. त्यातील पहिल्या उद्योग भवनाचे भूमिपूजन होत आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यासह अशी १८ उद्योग भवन उभारण्यात येणार आहेत.

श्री. सामंत म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून यापूर्वी वर्षाला ५ हजार १६ उद्योजक बनविण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात १३ हजार ५२६ उद्योजक राज्यात यावर्षी उभे करू शकलो. शहर अथवा ग्रामीण भागातील कोणत्याही युवक, युवतीला उद्योगासाठी ३५ टक्के सब्सिडी दिली जाईल. बँकांनी अशी कर्ज प्रकरणे आपल्या घरातीलच आहेत, असे समजून संवेदनशीलतेने १०० टक्के मंजूर करावीत.

उद्योग मित्र समिती गेल्या १५ वर्षांत स्थापन झाली नव्हती. उद्योगवाढीसाठी सर्वांना घेऊन जिल्हा उद्योग मित्र समिती स्थापन केली आहे. या समितीच्या बैठका सातत्याने झाल्या पाहिजेत. उद्योग वाढीसाठी ज्या ज्या सूचना असतील त्या यामधून आल्या पाहिजेत, असेही उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले. यावेळी जिल्हा उद्योग मित्र समितीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह म्हणाले, सर्व प्रकारच्या सेवासुविधा अशा उद्योग भवनाच्या माध्यमातून दिल्या जातील. पायाभूत सुविधांचा विकास करणे, निर्यातील प्रोत्साहनपर आवश्यक निर्णय घेणे, एकखिडकी योजनेतून सुविधा देणे यासाठी उद्योग मित्र कायदा झाला. अशा उद्योग भवनाच्या माध्यमातून या सेवा देण्यात येणार आहेत. आतापर्यंत ८ हजार २०३ अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी ७ हजार ९१३ अर्जांना परवानगी देण्यात आली आहे. हे याचे यश आहे.

जिल्हा उद्योग मित्र समितीचे सदस्य प्रशांत पटवर्धन यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करुन मैत्री कायदा फायदेशीर असल्याबाबत मत मांडले.

समारंभाला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, अतिरिक्त विकास आयुक्त शनमुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उद्योग सहसचिव संजय देगावकर, एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, अधीक्षक अभियंता कालिदास भांडेकर, अतिरिक्त उद्योग संचालक संजय कोरबू, उद्योग सहसंचालक विजू सिरसाठ आदी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version