
रत्नागिरी : स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे झालेल्या शिखर संमेलनात झालेल्या एका करारानुसार रत्नागिरीत विजेवरच्या वाहनांच्या निर्मितीचा कारखाना सुरू होणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
रत्नागिरी औद्योगिक क्षेत्रात नव्या अतिथिगृहाचे बांधकाम आणि जुन्या अतिथिगृह इमारतीचे नूतनीकरण करण्याच्या कामांचे भूमिपूजन आज श्री. सामंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, अमेरिकेतील एका कंपनीशी याबाबतचा करार झाला असून पुढची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. रत्नागिरीतील औद्योगिक विकास आणि मूलभूत सुविधांसाठी ८८ कोटींची योजना असल्याचेही श्री. सामंत यांनी सांगितले.
पालकमंत्री म्हणाले रत्नागिरीत येणाऱ्या मोठ्या उद्योजकांना तसेच येथील उद्योजकांना बैठक घेण्यासाठी सेव्हन स्टार विश्रामगृह पाहिजे, यासाठी राज्यातील सर्वांत सुंदर आणि सर्व सोयींनी सुसज्ज विश्रामगृह रत्नागिरीत उभारले जात आहे. जुन्या विश्रामगृहादेखील बरीच वर्षे झाली असल्याने त्याचेही नूतनीकरण करण्यात येत आहे. लोटे एमआयडीसीसाठी ७ कोटी, वॉटर सोर्स टाकीसाठी १२ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. उद्योजकांना, एमआयडीसीमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांना कोणतीही सुविधा अपुरी पडू नये, ही कामे करण्यात येत आहेत. रत्नागिरी एमआयडीसीमधील ८८ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून त्यांना कायम केल्याचे आदेश येत्या दोन दिवसांत येतील.
उद्योगमंत्री म्हणाले, रत्नागिरी जिल्हयाच्या उद्योगजगताला ताकद देण्यासाठी ८८ कोटी निधी रुपये मंजूर केले. त्यामध्ये एमआयडीसीला जोडणाऱ्या शिरगाव, नाचणे, निवसर, निवळी, मिरजोळे, टिके या ग्रामपंचायतींतील रस्त्यांसाठी ३१ कोटी रुपये, तर एमआयडीसीसाठी आवश्यक इतर रस्त्यांसाठी १३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. लोटे एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग येत आहेत. शैक्षणिक क्षेत्राचा विचार करता अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले. त्याची इमारत होत आहे. वैद्यकीय महाविद्यालयही रत्नागिरीमध्ये होत आहे. यामुळे रत्नागिरीतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. रायगड जिल्ह्यात स्कील इंडस्ट्रीज होत आहे. त्याच्या रत्नागिरी उपकेंद्रालाही तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे.
रत्नागिरी इंडस्ट्रीजला डी प्लसपेक्षा चांगल्या सोईसुविधा देण्यात येतील. उद्योजकांसाठी जे जे लागेल ते ते देण्याची हमी शासनातर्फे आम्ही देतो. परंतु उद्योजकांनीदेखील स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधान्य देणे आवश्यक आहे. उद्योगवाढीसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्यात येत आहेत. रत्नागिरी विमानतळाची धावपट्टी उत्कृष्ट आहे. वर्षभरात विमानतळ सुरू होईल. येत्या महिन्याभरात रत्नागिरीच्या विमानतळावर नाइट लँडिंग सुरू होत आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला चौथ्या अशियाई खो-खो स्पर्धेमध्ये भारताला विजेतेपद मिळविण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या रत्नागिरीच्या अपेक्षा सुतारचा विशेष सत्कार श्री. सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रीय खो-खो संघाचे प्रशिक्षक पंकज चंवडे यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एमआयडीसीचे मुख्य अभियंता सुभाष तुपे यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, कार्यकारी अभियंता राक्षे, ज्येष्ठ उद्योजक दिलीप भाटकर, फेडरेशन ऑफ रत्नागिरी डी स्टीक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, उपअभियंता बी. एन. पाटील, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप आदी मान्यवर उपस्थित होते.
कोतवडे जिल्हा परिषद गटात साडेसोळा कोटीच्या कामांचे भूमिपूजन
रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे जिल्हा परिषद गटातील सहा गावांमध्ये १६ कोटी ३५ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. श्री. सामंत यांचा रत्नागिरी मतदारसंघात दौरा सुरू झाला असून ताज्या दौऱ्यात त्यांनी कोतवडे जिल्हा परिषद गटातील भगवतीनगर, निवेंडी, ओरी, जांभरूण, वेतोशी आणि कोतवडे या ६ गावांमध्ये चालू आर्थिक वर्षासाठी मंजूर झालेल्या १६ कोटी ३५ लाखांच्या कामांचे भूमिपूजन झाले. त्यामध्ये भगवतीनगर गावातील एक कोटी दोन लाखाची कामे, निवेंडी गावातील ३ कोटी ८४ लाखाची कामे, ओरी गावातील १ कोटी ३७ लाखाची कामे, जांभरूण गावातील ९९ लाख, वेतोशी गावामधील ६ कोटी ३५ लाख, कोतवडे गावातील २ कोटी ७८ लाख इतक्या मंजूर निधीचा कामांचा समावेश आहे. एकूण ६२ कामांचे भूमीपूजन झाले.
श्री. सामंत यांनी मंजूर केलेल्या या कामांमध्ये गावपातळीवरील विकासकामांना चालना मिळाली असून आवश्यक कामे मंजूर झाल्यामुळे त्या त्या गावातील ग्रामस्थ समाधानी झाले आहेत. राज्यात उद्योगमंत्री म्हणून काम करत असताना आपल्या मतदारसंघातील ग्रामस्थांच्या नेमक्या गरजा लक्षात घेऊनच श्री. सामंत यांनी ही कामे मंजूर केली आहेत.
श्री. सामंत यांच्या समवेत जिल्हाप्रमुख राहुल पंडित, विधानसभा क्षेत्रप्रमुख गजानन पाटील, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, उपजिल्हाप्रमुख प्रकाश साळवी, महिला जिल्हा संघटक शिल्पा सुर्वे, महिला जिल्हा तालुका संघटक कांचन नागवेकर, युवा तालुका अधिकारी तुषार साळवी, विभाग प्रमुख स्वप्नील मयेकर, उपविभाग प्रमुख स्वप्नील पड्यार, उपविभागप्रमुख बावा हळदणकर, उपतालुका प्रमुख दिलीप शिवलकर, बंडू कुलकर्णी, प्रवीण जोशी, प्रकाश कदम, अमित घनवटकर, मंदार थेराडे, गौतम सावंत, रोहित मयेकर, ओरीच्या सरपंच आकांक्षा देसाई, उपसरपंच संकेत देसाई, वेतोशी सरपंच अरुण झोरे, प्रकाश भुते, भाई गोवळकर, अमोल बळकटे, महेंद्र आग्रे, मुकेश भुते, शैलेश बळकटे, सचिन चौघुले, संतोष कोकरे, सतीश सोबळकर, अतुल पाटील, प्रशांत मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.


गावागावांमधील विकासकामांसाठी पुरेसा निधी – उदय सामंत
गावागावांमध्ये विकासकामे करीत असताना कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही श्री. उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरी तालुक्यातील नाखरे काळकरकोंड, मेर्वी, गावखडी, पावस येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन श्री. सामंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी नाखरे काळकरकोंड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

खांबटवाडी नाखरे कालकरकोंड रस्ता वैद्यघाटी शाखेसह नूतनीकरण करणे, नाखरे काळकरकोंड मुख्य रस्ता ते बेनी फाटा रस्ता तयार करणे, नाखरे काळकरकोंड येथे वाडीत जाणाऱ्या रस्त्यावर साकव बांधणे, पावस अलीवाडी समीर नाखवा दुकानापासून रस्ता व गटार बांधणे या कामाचे भूमिपूजन, मेर्वी ग्रामपंचायत रस्त्यावर कॉजवे, प्रमुख राज्य मार्ग क्र. ४ ते गावखडी गावातून जाणारा रस्ता डांबरी नूतनीकरण आदी कामांचे भूमिपूजन श्री. सामंत यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, सरपंच शुभदा नार्वेकर, उपसरपंच विजय चव्हाण तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
Follow Kokan Media on Social Media

