पर्यावरणपूरक संकल्पांना शासनाचे सहकार्य : उदय सामंत

कोल्हापूर : उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजनांसाठी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा. यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.

कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाने आयोजित केलेल्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवानिमित्त उद्योजकांसाठी आज, २२ फेब्रुवारी रोजी विशेष परिषद घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, वायू आणि जल प्रदूषणापासून पृथ्वीला वाचविण्याची गरज आहे. उद्योगधंदे वाढले पाहिजेत, पण उद्योग निर्मितीनंतर त्याचे दुष्परिणाम समाजातील अन्य घटकांवर होऊ नयेत, यासाठी उद्योजकांनी स्वत: आचारसंहिता घालून घ्यावी. समाजासाठी काहीतरी देण्याच्या हेतूने उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधी (सी.एस.आर.) चा उपयोग पृथ्वी वाचविण्यासाठी करावा.

कोल्हापूरच्या पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून पंचगंगेचे शुद्धीकरण करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन करून श्री. सामंत म्हणाले, तीस दिवसांत उद्योगांसाठी परवाना देणारा कायदा येत असल्यामुळे उद्योगवाढीला गती मिळेल. परंतु उद्योगधंद्यांमुळे प्रदूषण होणार नाही, याची काळजी उद्योजकांनी घ्यायला हवी. भविष्यात जे काही करता येईल, ते पर्यावरणासाठी उपयुक्त असेल, अशी खूणगाठ बांधून यासाठी उद्योजकांनी पुढे यावे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी महत्त्वपूर्ण काम करणारा कणेरी मठ नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी सर्वांत पुढे राहिला आहे. माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांची व पर्यावरणाची काळजी घेण्याचा स्वामीजींचा संदेश सर्वांनी आत्मसात करण्याची गरज आहे. अशा कार्यक्रमांना राज्य शासन निश्चतपणे मदत करेल, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले की, जीवनात ध्येय निश्चत करा. तीव्र इच्छाशक्ती बाळगा, ध्येय पूर्ण करण्यासाठी खडतर परिश्रम करा. भारतीय आयुर्वेदात मोठमोठ्या आजारांवर मात करण्याची ताकद असून त्याचा प्रसार विदेशात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

यावेळी राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष ए. के. गोयल, उत्तर प्रदेशचे आमदार सी. पी. चंद, ट्रान्सग्नायझेशनचे संस्थापक रोहित अरोरा, अभिनेते संदीप कुलकर्णी, कागल औद्योगिक वसाहतीचे हरिश्चंद्र धोत्रे, पंजाबचे ओमेंद्र दत्त, सॅटर्डे क्लबचे नितीन देशपांडे, मठाचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील, कणेरी मठ संस्थानचे काडसिद्धेश्वर स्वामीजी, भैय्याजी जोशी तसेच विविध उद्योग संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे. पंचमहाभूतांच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने योगदान करावे, असे विचार उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यक्त केले.

प्रास्ताविकात विश्वस्त संतोष पाटील यांनी लोकोत्सवाबाबत माहिती दिली. कार्यक्रमात देशभरातील विविध क्षेत्रांतील उद्योजक सहभागी झाले.

कार्यक्रमानंतर उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी प्लास्टिक पुनर्निर्मिती प्रकल्पाला भेट दिली. तसेच पंचमहाभूत बोध प्रयोग पाहून यातून पंचतत्त्वांच्या संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

महावितरणकडून ‘सौर जागर’
सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात महावितरण कंपनीने सौरजागर केला. घरगुती ग्राहकांसाठी ४० टक्के अनुदान असलेली केंद्र सरकारची सौरछत योजना, शेतीला दिवसा वीज मिळावी, यासाठी राबविण्यात येत असलेली मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना या योजनांचा प्रामुख्याने प्रचार-प्रसार महावितरणतर्फे करण्यात येत आहे. त्यासोबतच बचत हीच निर्मिती या सूत्रानुसार विजेचा कार्यक्षम वापर आणि वीजबचत, महावितरणच्या ऑनलाइन ग्राहकसेवा, गो ग्रीन ही पर्यावरणपूरक सेवा, सुरक्षित वीजवापर, ग्राहकांनी नियमित वीज बिल भरावे, वीजचोरी रोखावी या विषयासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.

दरम्यान, सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवासाठी सुरळित वीजपुरवठा व्हावा,याकरिता महावितरणकडून जलद गतीने विद्युत सुविधांची उभारणी करण्यात आली. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महावितरणच्या कामाचे कौतुक केले.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply