कोल्हापूर : विश्व कल्याणाचा विचार करणारा भारत देश एक दिवस जगात सर्वश्रेष्ठ होईलच, असा विश्वास इस्रोचे शास्त्रज्ञ एस. व्ही. शर्मा यांनी व्यक्त केला.

कणेरी येथील सिद्धगिरी मठाने आयोजित केलेल्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवात दुसऱ्या दिवशी प्रथम सत्रात ‘आकाशतत्त्व-युवा’ चर्चासत्रात ते बोलत होते. ते म्हणाले, जेथे विज्ञान संपते, तेथे अध्यात्म चालू होते. विज्ञानाने कोणताही नवीन शोध लावला नसून आपले प्राचीन ऋषी, मुनी यांनी जे शोध लावले, त्याचे केवळ ‘डिकोडिंग’ करत आहोत. आपल्या प्रत्येकाला काळजी आहे की पर्यावरणाचे यापुढील काळात कसे होईल. मात्र भारताला वैश्विक विचाराचा पाय असल्याने आपण एक दिवस जगात सर्वश्रेष्ठ होऊ.
राजस्थान येथील पू. अभयदासजी महाराज म्हणाले, श्री क्षेत्र सिद्धगिरीचे कार्य अद्भुत असून संत काय करू शकतात, याची प्रचीती यानिमित्ताने येते.
राष्ट्रीय हरित लवादाचे ए. के. गोयल म्हणाले, आज देशातील ६० टक्के लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी नाही, अशी स्थिती आहे. देशात सर्वत्र कचर्याचे डोंगर उभे राहिले आहेत. दिल्लीसारख्या ठिकाणी तीन अतिभव्य कचर्याचे डोंगर आहेत. सरकार काही करेल अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता नागरिकांनाच पुढाकार घेऊन कृती करावी लागेल.
एनसीएसटीचे अध्यक्ष हर्ष चौहान म्हणाले, आदिवासी लोकांसाठी निसर्ग आणि समाज हे वेगळे नसून ते एकच समजतात. ते कधीही भूमीचे तुकडे पाडत नाहीत. पंचमहाभूतांचे संवर्धन केल्यानेच विश्वाचे कल्याण होणार आहे.
पेजावर येथील विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी म्हणाले, पंचमहाभूतांचे रक्षण करण्याचे दायित्व आपल्यावर आहे. आपण आकाशात अनेक उपग्रह पाठवले; मात्र त्यातील अनेकांचे काम झाल्याने ते आता कचरा म्हणून अवकाशात आहेत. अशा गोष्टींवर आपण योग्य त्या उपाययोजना काढल्या पाहिजेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, तरुणांनी पृथ्वीसारखे सगळ्यांना आधार देणारे, अग्निसारखे तेजस्वी, वायूसारखे प्रवाही, आकाशासारखे सगळ्यांना सामावून घेणारे व्यापक व्हावे.
यावेळी अक्षय कृषी परिवाराचे डॉ. गजानन डांगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले.
पंचमहाभूत लोकोत्सवात बुधवारी उद्योग संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये कोल्हापुरातील सर्व उद्योग संस्था तसेच केंद्र राज्य सरकारचे उद्योगविषयक सचिव प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत होणार असलेल्या या संमेलनाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
आजपासून सुरू झालेल्या देशी जनावरे आणि गाढव प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद लाभत आहे.
बुधवारी ५० चित्रकार कलाकृती साकारणार
पंचमहाभूत महोत्सवामध्ये परिसरातील सुमारे ५० चित्रकार बुधवारी (दि. २२ फेब्रुवारी) कलाकृती साकारणार आहेत. अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि अवकाश या विषयांवर मानव समाजाला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. त्यातूनच तत्त्वज्ञान, पर्यावरण, विज्ञान, संशोधन आणि जीवनकौशल्य याबाबत जगभर वेगवेगळ्या क्षेत्रात चिंतन, संशोधन सुरू असते. याच विषयावर श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमंगलम् पंचमहाभूत महोत्सव होत आहे. त्याचाच भाग म्हणून कोल्हापूरमधील ५० चित्रकार आपल्या कलाकृती साकारणार आहेत. बुधवारी सकाळी ८ ते दुपारी चार या कालावधीत हा कला सोहळा होईल. या सोहळ्यात साकारल्या जाणाऱ्या कलाकृती मठाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आणि कला रसिकांसाठी बघण्यासाठी कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहेत.

