मुंबई : शिवकालीन मोडी लिपीच्या प्रसाराचे काम करणाऱ्या मोडी लिपी मित्र मंडळाच्या ‘मोडीदर्पण’ या चौदाव्या दिवाळी अंकाचे पवई येथे थाटात प्रकाशन झाले.
पवई इंग्लिश हायस्कूलच्या सभागृहात संपादक सुभाष लाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला लेखक, कवी, चित्रकार विजयराज बोधनकर आणि सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते नाटककार डॉ. मंगेश हांदे, चित्रकार सुरेश डुंबरे, लेखक सुरेश हांडे, संघाचे सरचिटणीस प्रमोद पवार, मोडी जाणकार सुनील कदम, इतिहासकार प्रवीण कदम, पत्रकार सुनील आवटी, प्रकाश हरचेकर, विजय बाराथे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपसंपादक दीपक नागवेकर यांच्या प्रास्ताविकानंतर मोडीसहित भारतीय लिप्यांचा अभ्यास करणाऱ्या नाशिकच्या सौ. पूजा गायधनी यांना यंदाचा ‘मोडीमित्र’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यकारी संपादक विजय हटकर यांनी यावर्षीच्या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य अधोरेखित केले. त्यानंतर कोकणच्या शिवकालीन सरदार घराण्यांचा इतिहास मांडणाऱ्या, शिवरायांच्या आज्ञापत्रांना मोडीसहित इतर लिप्यांमध्ये लिप्यांतर करून अभ्यासकांना खजिना देणाऱ्या मोडीदर्पण दिवाळी अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

याच व्यासपीठावर प्रमोद कोनकर संपादित ‘कोकण मीडिया’ या रत्नागिरीच्या साप्ताहिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन, तरुण उद्योजक गणेश चव्हाण यांच्या सिद्धी ट्रॅव्हल्सच्या बोधचिन्हाचे प्रकाशन तसेच कोकण अमृत बहुउद्देशीय कृषी उत्पादन कंपनीच्या सौ. प्रांजल व दत्तप्रसाद कोलते यांचा सन्मान करून मोडी परिवार सगळ्यांसाठी सहाय्यभूत असल्याचे प्रतीत झाले.
अच्युत पालव यांनी यावेळी सांगितले की, मोडी लिपी मित्र मंडळ अनेक वर्षे मोडी प्रसाराचे काम करते आहे. त्या कामाचा मी एक भाग आहे, याचा मला अभिमान वाटतो. लवकरच त्यांनी मोडी अभ्यासकांना एकत्रित आणण्यासाठी मोडी संमेलनाचे आयोजन करावे.
मोडीदर्पण दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा पाहून, जमलेले शिवप्रेमी पाहून आपण आज श्रीमंत झालो आहोत असे कौतुकाचे उद्गार काढताना विजयराज बोधनकर यांनी सांगितले की, मोबाइलमध्ये अडकलेल्या तरुण पिढीला बाहेर काढण्यासाठी वाचन संस्कृतीच कामी येईल.
मोडी अभ्यासक सुनील कदम यांनी मोडीचा संक्षिप्त इतिहास मांडून छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्रांचा आशय विशद केला.
संपादक सुभाष लाड यांनी मोडीदर्पण प्रकाशनाकरिता अनेकांचे हात सोबत असल्याचा आनंद व्यक्त केला. लवकरच महाराष्ट्रातील सर्व मोडी जाणकार, अभ्यासक, इतिहासकार आणि शिवप्रेमींना एकत्र आणून मोडीच्या भविष्यातील वाटचालीचा ऊहापोह करण्यासाठी संमेलन आयोजित करावे लागेल. त्यावेळी आपण सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
महेंद्र साळवी यांनी खुमासदार शब्दांत आभारप्रदर्शन केले.



