रत्नागिरी : धनत्रयोदशीच्या दिवशी (१० नोव्हेंबर २०२३) धन्वंतरीपूजन करून रत्नागिरीत राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्यात आला. आयुर्वेद व्यासपीठ आणि निमा या संस्थांच्या रत्नागिरी शाखा, तसेच रत्नागिरी डॉक्टर्स असोसिएशनने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुमारे ४० वैद्य, तसेच आयुर्वेदप्रेमी नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या वेळी वैद्य पराग दाते यांनी ‘नित्य अभ्यंगाचे महत्त्व’ या विषयावर आपले विचार मांडले. ‘आपण स्वतः आयुर्वेद आचरणात आणला, तर तो आपण अधिक प्रभावीपणे आपल्या रुग्णांना सांगू शकतो. त्याचा समाजाला नक्कीच फायदा होईल,’ असे वैद्य दाते म्हणाले. प्रत्येक वैद्याने दिवाळीच्या अभ्यंगस्नानापासून याची सुरुवात करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्य मंजिरी जोग यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. मिलिंद कुळकर्णी आणि डॉ. प्रसन्न मुळ्ये यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आयुर्वेद व्यासपीठाच्या रत्नागिरी शाखेच्या पुढाकाराने सुरू झालेला एकत्रित धन्वंतरीपूजनाचा कार्यक्रम स्तुत्य असून, दर वर्षी अशाच प्रकारे एकत्रितपणे तो साजरा करू, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

