कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनाची पुस्तके मॉरिशसमध्ये

सौ. विजयालक्ष्मी देवगोजी

रत्नागिरी : येथील कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनाने प्रकाशित केलेली पुस्तके मॉरिशस येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या समृद्ध ग्रंथालयाला भेट म्हणून देण्यात आली. लांजा येथील साहित्यिक सौ. विजयालक्ष्मी देवगोजी यांनी ही पुस्तके सुपूर्द केली.

मॉरिशस विद्यापीठ, तेथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ तसेच सातारा येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त
विद्यमाने आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र अलीकडेच मॉरिशस येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटमध्ये पार पडले. भारत-मॉरिशस आंतर सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंधांचा कला, साहित्य आणि संस्कृती यावरील प्रभाव हा चर्चासत्राचा विषय होता. यावेळी इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांमधून आलेल्या २५ शोधनिबंधाचे वाचन करण्यात आले. मराठी साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या लांज्यातील पदाधिकारी सौ. विजयालक्ष्मी देवगोजी यांनी यावेळी कोकणातील जाखडी (मॉरिशसमध्ये झाकरी) : सांस्कृतिक संबंध या विषयावरील शोधनिबंधाचे वाचन केले.

मुंबई बंदरातून १८४३ साली निघालेल्या जहाजातून १७३ लोक ब्रिटिशांनी मॉरिशस येथे ऊसतोडणीच्या कामासाठी नेले होते. त्यामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर येथील लोकांचा सर्वाधिक भरणा होता. आपली मायभूमी सोडून स्थलांतरित झालेल्या या लोकांचे परतीचे दोर ब्रिटिशांनी कापून टाकल्यामुळे हे लोक तेथेच स्थायिक झाले. मॉरिशस येथील पर्वतीय प्रदेश आणि समुद्रामुळे कोकणासारखेच वातावरण तेथे असल्याने ते लोक पुढे तेथेच रमले आणि तेथे त्यांनी आपली मराठी संस्कृती, धर्म, सणवार, उत्सव, खाद्यपदार्थ यांची जपणूक केली आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील जाखडी हे लोकनृत्य आजही काही प्रमाणात बदल होऊन तेथे ‘झाकरी’ या नावाने सादर केले जाते. गणेशोत्सवात हे नृत्य सादर केले जाते. या नृत्याच्या स्पर्धाही घेतल्या जातात. नितीन बापू, बीदेन आबा यांसारखे अनेक लोक या नृत्याच्या संवर्धनासाठी अत्यंत प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर सौ. देवगोजी यांनी जाखडी नृत्याचा आढावा घेणारा शोधनिबंध सादर केला.

याशिवाय देवाची आरती करताना गणेश आरतीबरोबरच ‘युगे अठ्ठावीस’ ही विठ्ठलाची आरती न म्हणता कोकणात प्रसिद्ध असणारी ‘येई हो विठ्ठले माझे माऊली ये’ ही आरती मृदुंग, टाळचिपळ्या यांच्या गजरात तेथे म्हटली जाते, अशी माहिती यावेळी सौ. देवगोजी यांना मिळाली.

यानिमित्ताने मॉरिशसच्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूटमधील मराठी विभाग प्रमुख डॉ. मधुमती कुंजला यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्यातील लेखकांची विविध साहित्यप्रकारातील पुस्तके सप्रेम भेट देण्यात आली. त्यातच कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचा समावेश होता. सौ. देवगोजी यांनी लिहिलेले ‘अशी घडली राजस्विनी’ हे पत्रसंग्रहाचे पुस्तक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडक लेखकांचा परिचय करून देणारे ‘सिंधुसाहित्यसरिता’, सिंधुदुर्गातील नवोदित लेखकांचा आविष्कार असलेले ‘बीज अंकुरे अंकुरे’, लांजा येथील विजय हटकर यांनी लिहिलेले माचाळच्या पर्यटनाविषयीचे पुस्तक यांचा त्यात समावेश होता. याशिवाय ‘अजि म्या परदेस पाहिला’ हे विजयलक्ष्मी देवगोजी यांचे प्रवासवर्णन, साप्ताहिक विवेकने संपादित केलेले लोकमान्य टिळक यांचे चरित्र, श्रीकृष्ण जोशी यांचे ‘त्रिदल’ हे नाटक, ‘आबूट घेऱ्यातील सूर्य’ हा अरुण इंगवले यांचा कवितासंग्रह, ‘पिपीलिका मुक्तिधाम’ ही बाळासाहेब लबडे यांची कादंबरी, शिक्षकांसाठी साने गुरुजी ही पुस्तकेही भेट देण्यात आली. ही पुस्तके ज्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली, त्या डॉ. मधुमती कुंजला यांच्या मातोश्रीच्या मूळच्या रत्नागिरीच्याच रहिवासी आहेत, हा आणखी एक योगायोग होता.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply