चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात तिघा अपरान्तपुत्रांच्या तैलचित्रांचे अनावरण जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
वाचनालयाचे काम कौतुकास्पद आहे. अखिल जगाचा व्यापक विचार करून रत्नागिरी जिल्ह्यात १८५४ साली ‘जगन्मित्र’ हे पहिले वर्तमानपत्र सुरू करणारे पत्रकार कै. जनार्दन हरि आठल्ये, हिंदी वृत्तपत्रसृष्टीचे भीष्म पितामह कै. बाबूरावजी रामचंद्र पराडकर, तळहाती शिर घेऊन स्वातंत्र्यसमरात देहाची समिधा अर्पण करणारे क्रांतिकारक कै. गणेश गोपाळ आठल्ये या तीन महनीय ‘अपरान्त’पुत्रांच्या तैलचित्राचे अनावरण झाले आहे. वाचनालयाला सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी भावना श्री. कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली. कोकणातील लोकसंस्कृती जपण्याचे काम वाचनालय आपुलकीने करत आहे, असेही ते म्हणाले.
वाचनालयातर्फे पत्रकार दिनाच्या निमित्ताने हा अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. वाचनालयाच्या आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर सभागृहात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. श्री. कुलकर्णी पुढे म्हणाले, आजची पिढी रील्सकडे वळली आहे. वाचनसंस्कृती मागे पडते आहे. त्यामुळे वाचनालयाचे काम अविरत पुढे चालायला हवे आहे. पत्रकारदिनी एक चांगला योग जुळून आला आहे. माझ्या हस्ते तीन महनीय व्यक्तींच्या तैलचित्रांचे अनावरण होत आहे. त्याचा मनस्वी आनंद होत आहे. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर वेगवेगळे उपक्रम घेऊन समाजासाठी काम करीत आहे. त्यामुळे या संस्थेला माझे कायम सहकार्य राहील. यापुढील सर्व कार्यक्रमांना माझे पूर्ण सहकार्य राहील. आज वाचनाची खरी गरज आहे. लोकांनी वाचले पाहिजे. वाचनालय चालवितानादेखील व्यवस्थापनाने अत्याधुनिक युगाचा अवलंब केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. समाजमाध्यमांवर अतिशयोक्ती निर्माण करणारा मजकूर प्रसृत होत असताना जागरूकतेने काम करावे लागणार असल्याचे कुलकर्णी म्हणाले.
ज्यांची तैलचित्रे लावण्यात आली, ते जनार्दन हरि आठल्ये, बाबूरावजी रामचंद्र पराडकर यांच्या जीवनकार्याचा आढावा धीरज वाटेकर यांनी घेतला. क्रांतिकारक कै. गणेश गोपाळ आठल्ये यांच्याविषयीचे विवेचन कीर्तनकार शैलेश आठल्ये यांनी केले.
कार्यक्रमाला वाचनालयाचे उपाध्यक्ष सुनील खेडेकर, पोलिस निरीक्षक, अपरांतपुत्रांच्या मूळ छायाचित्रांची उपलब्ध करून देणारे यशवंतराव आठल्ये, क्रांतिकारक आठल्ये यांचे नातू सुरेश आठल्ये, वाचनालयाचे कार्यवाह विनायक ओक उपस्थित होते.
यावेळी सुनील खेडेकर आणि विनायक ओक यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन वाचनालयाचे संचालक धीरज वाटेकर यांनी केले, तर आभार कार्यवाह विनायक ओक यांनी मानले.




कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

