Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

हर्षली अयोध्या नगरी कार्यक्रमात रामभक्त चिंब

Advertisements

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे (पावस, रत्नागिरी) येथील अध्यात्म मंदिरात आयोजित हर्षली अयोध्या नगरी या संगीतमय कार्यक्रमात निर्माण झालेल्या भक्तिरसात रामभक्त चिंब भिजून निघाले.

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर स्थापना आणि राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला स्वामी स्वरूपानंदांच्या मूर्तीला गुहागरमधील करसेवक अनिरुद्ध भावे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्यवाह ऋषिकेश पटवर्धन, विवेक भावे यांच्यासमवेत कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. भावे यांनी राम मंदिराचा इतिहास, मंदिरासाठी झालेला संघर्ष, करसेवेतील अनुभव कथन अत्यंत ओघवत्या शैलीत केले. त्यांच्या भाषणानंतर सर्वांनी प्रभू श्रीरामाचा जयजयकार केला.

मैफलीत गायक भूषण शितूत, ओंकार बापट, अभिजित नांदगावकर, करुणा पटवर्धन यांनी सुरेल आवाजात राम गीते सादर केली. त्यांना तबलासाथ सौरभ शिंत्रे, राजू धाक्रस, हार्मोनियम चैतन्य पटवर्धन आणि तालवाद्यसाथ अद्वैत मोरे आणि राघव पटवर्धन यांनी केले. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांनी केले.

गायक भूषण शितूत यांनी आरंभी वंदीन, योग ऐसा दिव्य, करुणा पटवर्धन यांनी शरयू तीरावरी, राम जन्माला ग सखी, राम भजन कर मन, विजय पताका आणि राम नाम धरा ही गीते सुरेल आवाजात सादर केली. अभिजित नांदगावकर यांनी राम का गुण गान, नादातुनी या आणि अंजनीच्या सुता, ओंकार बापट यांनी विश्वाचा विश्राम रे हे गीत ऐकवले. हर्षली अयोध्या नगरी, त्रिवार जयजयकार, संहारून अरी या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला रामभक्तांची गर्दी झाली होती.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version