रत्नागिरी : अयोध्येत राम मंदिर होणे, ही आपल्या सर्वांची अस्मिता होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ती पूर्ण केली. त्याचा आपणा सर्वांना अभिमान आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
येथील जयेश मंगल पार्कमध्ये श्री राम मंदिर ट्रस्ट आणि रत्नागिरी पालिकेतर्फे अयोध्येतील राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यावेळी श्री. सामंत बोलत होते. ते म्हणाले, माझ्या शालेय जीवनापासून दर पाच वर्षांनी राम मंदिरचा मुद्दा चर्चेत यायचा. आज मंदिर पूर्ण झाले आहे. आजचा दिवस घरोघरी दिवाळी उत्सवाचा दिवस आहे. जिल्ह्यातील चार हजार ६६३ ग्रामदैवतांची मंदिरे आणि १९६ राम मंदिरात हा सोहळा होत आहे. रत्नागिरीचा हा पॅटर्न महाराष्ट्राचा झाला आणि तो देशात गेला.
श्री. सामंत म्हणाले, जिल्ह्यातील दोन हजार मंदिरांची स्वच्छता दोन दिवसात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली ‘डीप क्लिनिंग’ ही स्वच्छता मोहीम रविवारपासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्हावासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्याधिकारी तुषार बाबर, वकील राजशेखर मलुष्टे आदींसह श्री राम मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी श्री राम प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले.
‘जय श्री राम, जय सियाराम’च्या घोषणा देत, टाळ्या वाजवून आणि फटाके वाजवून या सोहळ्याचा उपस्थितांनी आनंदोत्सव साजरा केला. प्रसाद म्हणून लाडू तसेच खिचडीचेही वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला नागरिकांची विशेषत: महिलांची मोठी उपस्थिती होती. अभिजित केळकर यांनी सूत्रसंचालन केले.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

