मठ (ता. लांजा) : अयोध्येतील राममंदिर पुनर्निर्माण आणि राममूर्तीची प्रतिष्ठापना झाल्याच्या दिवशी येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथाच्या मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. अयोध्येतील करसेवकांनी केलेल्या अनुभवकथनाने हा दीपोत्सव भावनोत्कट झाला. श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात अयोध्येतील ऐतिहासिक घटनेचा आनंद व्यक्त करण्यासाठी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत अनेक कार्यक्रम पार पडले. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)

सकाळी पवमान पंचसूक्ताने अभिषेक करण्यात आला. सायंकाळी आरतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुमारे तीन हजार पणत्या प्रज्ज्वलित करून दीपोत्सव करण्यात आला. मंदिरावर विद्युत रोषणाईही करण्यात आली. मंदिराभोवती सवाद्य प्रदक्षिणा घालण्यात आल्या. त्यामध्ये पालखी नृत्य करण्यात आले. मंदिरात रामरक्षा पठण आणि नामजप करण्यात आला. त्यामध्ये लहान मुलांची उपस्थिती लक्षणीय होती. महिला आणि तरुणांनीही सर्व कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.
अयोध्येत १९९० साली करसेवा केलेल्यांचा कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. त्यामध्ये सुधाकर श्रीराम चांदोरकर (रत्नागिरी), सतीश जयराम चांदोरकर (आंजणारी, लांजा), शिरीष शितूत (रत्नागिरी), प्रवीण मधुकर सावंत (पाली), प्रमोद श्रीराम खटकूळ (नाणीज), हृषीकेश राऊत (कै. सदानंद राऊत यांच्या वतीने), नितीन कुसुमाकर शेट्ये (लांजा), मनोज मनोहर सुर्वे (पाली), शेखर बाळकृष्ण संसारे (नाणीज), सौ. उज्ज्वला संजय धामणस्कर (रत्नागिरी), प्रफुल्ल पर्शराम सप्रे (लांजा) यांचा समावेश होता. सन्मानपत्र, मंदिराची प्रतिकृती, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात प्रवीण सावंत, सौ. उज्ज्वला धामणस्कर, शेट्ये या करसेवकांनी करसेवेतील आपले अनुभव सांगितले.
प्रवीण राऊत यांना करसेवेतील सहभागाबद्दल अटक करण्याचे आदेश निघाले होते. पण पोलिसांना चकविण्यात ते यशस्वी झाले. मात्र बाबरी मशिदीची मूळ इमारत पाडण्यात सहभाग असलेल्या कोठारी यांच्यावर त्यांच्या डोळ्यांदेखत गोळ्या घालण्यात आल्या. हा त्यांनी सांगितलेला प्रसंग ऐकल्यानंतर सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला. आता मंदिर उभे राहिल्यामुळे हा खूपच भाग्यशाली दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक हिंदूसाठी हा स्वाभिमानाचा दिवस आहेच, पण अयोध्येतील राममंदिर म्हणजे राष्ट्रमंदिर ठरावे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
करसेवेतील या अनुभवकथनामुळे लक्ष्मीपल्लीनाथाच्या परिसरात उजळलेल्या पणत्यांबरोबरच दीपोत्सवाला उपस्थित असलेल्या सर्वांच्या मनात राममंदिराच्या निर्माणामुळे राष्ट्रमंदिराविषयीचे स्फुलिंग प्रज्ज्वलित झाले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड









