रत्नागिरी : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री महोदयांशी झालेल्या चर्चेनुसार एसटीप्रमाणेच ग्रामीण भागातून येणाऱ्या सिटी बसचे तिकीटदेखील महिलांना ५० टक्के दरात मिळणार आहे. लवकरच हा निर्णय होईल, अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.
येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री. सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ते म्हणाले, राज्यातील प्रथम क्रमांकाचे ९२ कोटी खर्चाचे प्रशासकीय भवन रत्नागिरीमध्ये उभारले जाणार आहे. राज्य शासनाची त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ‘रत्नागिरीचा सन्मान हाच आमचा अभिमान’, हे स्लोगन घेऊन रत्नागिरीकर आणि प्रशासन जोरदार काम करत आहे. ते म्हणाले, ५०० वर्षांपासून असलेली मागणी आणि भारतीयांची अस्मिता असणारे प्रभू रामचंद्राचे मंदिर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. या ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या पूर्णतेबद्दल जिल्हावासयांच्या वतीने प्रधानमंत्र्यांना मनापासून धन्यवाद देतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा विकासात्मक घोडदौड करत आहे.
प्रत्येकाच्या जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जलजीवन मिशनमधून होणाऱ्या नळ पाणी योजनांसाठी जिल्ह्याककरिता ११०० कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, सिंधुरत्न ही ऐतिहासिक योजना आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी या योजनेमधून हाऊसबोट देण्यात आली आहे. महिलांनी चालविलेली हाऊसबोट पर्यटकांना पाहायला मिळेल. जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी याचा निश्चित उपयोग होणार आहे. एपीजे अब्दुल कलाम जिल्ह्यातून घडले पाहिजेत. त्यासाठी गरिबांच्या मुलांना नासा आणि इस्रोला पाठविणारा राज्यातील पहिला जिल्हा रत्नागिरी ठरला आहे.
जिल्ह्याचा ३०० कोटींचा विकास आराखडा असून, शासन निश्चित यावर्षी वाढवून देईल. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडेल. अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना या सर्व योजनांसाठी नियमानुसार खर्च करण्याचे नियोजन आम्ही सर्व करत आहोत. पोलिसांच्या घरांचा प्रकल्प रत्नागिरीत होत आहे. त्यासाठी १५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यांच्या वाहनांचा वा सीसीटीव्हीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.
रत्नागिरी हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा आहे. त्यादृष्टीने प्राणिसंग्रहालयाच्या कामास सुरुवात झाली आहे. देशातला पहिला थ्रीडी मल्टीमीडिया शो येथे होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्यातील सर्वांत उंच पुतळ्याचे अनावरण येत्या ४ फेब्रुवारील होत आहे.
सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास करता यावा, यासाठी रत्नागिरीतील विमानतळ विकसित होत आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीसाठी १०० कोटी राज्याने मंजूर केले आहेत. लवकरच सर्वसामान्य माणसाच्या सेवेत हे दाखल होईल आणि त्याला विमान प्रवास करता येईल. विकासाची अनेक कामे करत असताना मंडणगड, चिपळूण, दापोली, गुहागर, संगमेश्वर त्याचबरोबर अन्य ९ शहरांच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे काम शासनाने केले आहे. काजू बोर्डाकरिता ५ वर्षांसाठी १३०० कोटी मंजूर केले आहेत. आंबा बोर्ड असावे अशी आंबा बागायतदारांची मागणी होती, त्याला तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्याचबरोबर साडेनऊ कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला असून लवकरच आंबा बागायतदारांच्या खात्यात जमा होतील.
ध्वजवंदनानंतर पालकमंत्र्यांनी संचलनाचे निरीक्षण केले. संचलनात पोलीस मुख्यालय पथक, गृहरक्षक दल, पोलीस बँड पथक, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे एनसीसी आर्मी, एनसीसी नेव्हल, पटवर्धन हायस्कूलचे एनसीसी आर्मी, एनसीसी नेव्हल, ए डी नाईक उर्दू स्कूलचे स्काऊट गाइड पथक, जवाहर नवोदय विद्यालयाचे स्टुडंट पोलीस कॅडेट पथक, पोलीस श्वान पथक व्हिक्टर डॉगकडून मानवंदना, चित्ररथात मोबाइल फॉरेन्सिक इन्वेस्टिगेशन व्हॅन, पालिकेचे अग्निशमन दल, १०८ रुग्णवाहिका, शिक्षण विभागातर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व इतर उपक्रम, ढोल पथक, लेझिम पथक, महावाचन उत्सव, चांद्रयान मोहीम-जिल्हा परिषद शाळा, मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा, नवभारत साक्षरता अभियान योजना विभाग, गोदूताई जांभेकर विद्यालय, जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग, नवनिर्माण हायस्कूलचा ग्रामीण शेतीदर्शन, मराठा मंदिर ग्लोबल स्कूलचा चित्ररथ, नगरपरिषेदचा पीएम आवास योजना, इव्हीएम मशीन आदींचा समावेश होता.
दैनंदिनी रोशन आंबेकर हिला जिल्हा माहिती कार्यालयातील शिपाई पदावर पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे यांनी याबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली. महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाच्या जिल्हास्तरीय विजेते नीलिमा आखाडे, ज्युली रहाटे, रिद्धी माळी, मृण्मयी चिंचचौरे, साक्षी आंब्रे, गौरव सावंत, स्वरुप शिरगावकर, मानस गावकर, श्रृती पडघन, यश खामकर यांना प्रत्येकी १ लाख बीज भांडवल व प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे जिल्हा शासकीय रुग्णालय आणि बी के एल वालावलकर यांना प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सांगता झाली.
यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ गणेश मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते.
Follow Kokan Media on Social Media

