वानर-माकडांसंदर्भात अविनाश काळे यांना पुन्हा एकदा आश्वासन

रत्नागिरी : वानर-माकडांच्या त्रासाला कंटाळल्याने आत्महत्येची परवानगी द्यावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अॅड. अविनाश काळे केलेल्या पदयात्रेच्या आंदोलनात त्यांना पुन्हा एकदा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाहीबाबत आश्वासन दिले आहे.

श्री. काळे यांनी घराजवळच्या वडपिंपळ ओझर देवस्थानापासून पदयात्रेला सुरुवात केली. पत्नी आणि कन्येसोबत त्यांनी पदयात्रेला सुरुवात केली. त्यांच्यासोबत कुवारबाव, गावखडी, कोळंबे, पूर्णगड, जांभुळआड, गोळप, नाटे, गुहागर, कुर्धे, पावस, नेवरे इत्यादी गावांमधील पुरुष आणि महिला पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. रत्नागिरीत पोहोचल्यावर पालकमंत्री शहरात कार्यक्रमात व्यस्त असल्याने प्रथम त्यांच्या कार्यालयात श्री. काळे यांनी कुटुंबासह आत्महत्येची परवानगी द्या, असे पत्र दिले. बाकी सगळ्यांनी आत्महत्येची परवानगी द्या, असे पत्र दिले.

जिल्हाधिकाऱ्यांची बैठक सुरू असल्याने कार्यालयात चिटणीस शाखेत पत्र दिले. बाकी सगळ्यांची पत्रे नोंदणी शाखेत दिली. विभागीय वनअधिकारी श्री. खाडे आणि परिक्षेत्र वनअधिकारी श्री. सुतार जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आलेले असल्याने तेथेच कार्यालयात भेटले. त्यांनी पत्र स्वतः स्वीकारले. वानर आणि माकडांची नसबंदी किंवा त्यांना मारणे हा धोरणात्मक निर्णय असल्याने तो मंत्रालयात प्रलंबित आहे. त्याला कालावधी लागण्याची शक्यता आहे. मात्र संभाजीनगर येथे सुतार आणि त्यांची टीम वानर माकड पकडण्याचे प्रशिक्षण घेऊन आली आहे. आम्ही मोठा पिंजरा बनवून त्यात केळशी येथे २० माकडे पकडून चाचणी घेतली आहे. जिल्हा नियोजनमधून निधी मिळावा यासाठी २३ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला आहे. निधी मिळाला की लगेच जिल्ह्यातील वानरे, माकडे पकडून अभयारण्यात सोडण्यासाठी आपल्या गावापासून सुरुवात करू, असे आश्वासन दिले.

पदयात्रेबाबत श्री. काळे म्हणाले, वानर-माकडांच्या त्रासाला शेतकरी कंटाळले आहेत. शेतीला होणाऱ्या त्यांच्या उपद्रवामुळे कोकणातील शेतकऱ्यांना शेती करणेच अशक्य झाले आहे. याबाबत अनेकदा आंदोलने, बैठका, सभा, अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊनही आश्वासनांपलीकडे काहीही मिळाले नाही. अखेरचा उपाय म्हणून पदयात्रेने येऊन आत्महत्येची परवानगी देण्याबाबतची पत्रे दिली होती. त्यानुसार पदयात्रा काढण्यात आली. विशेष म्हणजे पालकमंत्री उदय सामंत किंवा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह कार्यालयात असूनही त्यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून निवेदन प्रत्यक्ष स्वीकारण्यासाठीही वेळ दिला नाही. यावरून त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य नाही, हेच स्पष्ट झाले. पण ठरल्यानुसार पदयात्रा काढून निवेदने सादर केली. बाकी सगळ्यांची पत्रे रत्नागिरी कार्यालयातील वनपाल यांच्याकडे दिली. त्यानंतर पदयात्रा आणि आत्महत्येची परवानगी द्या या मागणीसाठी केलेला पत्राचा उपक्रम संपला. काहींनी पदयात्रेत सहभाग घेतला. काहींनी अडचणीमुळे शेवटी येऊन सगळ्यांना पत्र दिले. अनेकांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. जिल्ह्यात मनाई आदेश जाहीर झाला असल्यामुळे उपस्थिती बाबत थोडा परिणाम जाणवला. सामान्य माणूस आधीच पिचलेला असल्याने नवीन त्रास नको, अशा विचाराने घाबरतो. तरीही जे नागरिक आले होते ते मनापासून आणि स्वतःहून आले होते. वानर-माकडांचा प्रश्न कायमचा सुटेपर्यंत सगळ्यांच्या सहकार्याने प्रयत्न करत राहणार आहे, असे श्री. काळे यांनी सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply