मौजे टेरव बुद्रुक हे मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम १०० टक्के पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं गाव

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातलं मौजे टेरव बुद्रुक हे मतदारयादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम १०० टक्के पूर्ण करणारं महाराष्ट्रातलं पहिलं गाव ठरलं आहे. ३० जूनपासून सुरू झालेल्या या उपक्रमात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी भेटी देऊन आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत अचूकतेने आणि तेही विहित कालावधीच्या आधीच पूर्ण केलं आहे.

या गावामध्ये एकूण १९५ मतदार असून, त्यात ९३ महिला आणि १०२ पुरुषांचा समावेश आहे. गावातल्या सर्वांना गणना प्रपत्राचं वाटप करण्यात आलं होतं. त्यापैकी १८७ मतदारांचं गणना प्रपत्र ॲपद्वारे यशस्वीरीत्या डिजिटायझेशन करून ऑनलाइन नोंदवण्यात आलं. आठ प्रपत्रं जमा न होण्याजोगी ठरली आणि त्यांचं अत्यंत सखोलपणे वर्गीकरण करण्यात आलं. त्यामुळे मृत झालेले दोन मतदार, दुबार नोंदणी झालेले पाच मतदार आणि कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या एका मतदाराची अचूक माहिती समोर आली. आता कायदेशीर प्रक्रियेद्वारे मतदारयादी संपूर्णपणे निर्दोष करून अद्ययावत करण्यात आली आहे.
या ऐतिहासिक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सुप्रिया लोखंडे, पर्यवेक्षक आस्माकौसर राजअहमद देसाई, मंडळ अधिकारी नारायण चौधर, अंगणवाडी सेविका मधुरा विश्वनाथ साळवी, पोलीस पाटील सुहास मोहिते, ग्राम महसूल अधिकारी शुभम उतेकर, निवडणूक शाखेचे महसूल सहायक अनिकेत शिर्के आणि ग्रामपंचायतीच्या पथकाने मेहनत घेतली. चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे आणि निवडणूक नायब तहसीलदार रसिका रसाळ यांनी या संपूर्ण कामावर देखरेख ठेवली. चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष मोहिमेसाठी मौजे टेरव बुद्रुक या गावाची निवड करण्यात आली होती. या यशाबद्दल जिल्हा प्रशासनाकडून टेरव बुद्रुक गावाचं आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणेचं विशेष कौतुक होत आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply