रत्नागिरी : रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिकांनी गाजलेल्या मराठी नाटकांमधील अनेक सौंदर्यस्थळे नव्याने अनुभवली. चंद्रशेखर ठाकूर यांनी ही सौंदर्यस्थळे उलगडून दाखवली.
रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मराठी नाटकांतील सौंदर्यस्थळे हा चंद्रशेखर ठाकूर यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री. ठाकूर या कार्यक्रमातून मराठी नाटकांच्या सुवर्णकाळातील एक धावती सफर घडविली. मुंबई शेअर बाजारात दीर्घ काळ वरिष्ठ पदावर काम केलेले श्री. ठाकूर यांनी नाटकाची आवड आणि अभिरुची केवळ जोपासली असे नव्हे, तर त्यातील अनेक बारकावे त्यांनी टिपले. वेळप्रसंगी अभिनेते, लेखक, दिग्दर्शकांची भेट त्यांनी घेतली आणि अधिक माहिती घेतली. ती आपल्याकडे साठवून ठेवली. स्वतः अनुभवलेला हा आनंदाचा ठेवा ते मराठी नाटकांतील सौंदर्यस्थळे या कार्यक्रमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. याच कार्यक्रमाचा एक प्रयोग रत्नागिरीत ज्येष्ठ नागरिक संघात झाला.
श्री. ठाकूर यांनी डॉ. काशिनाथ घाणेकर, शंकर घाणेकर, प्रभाकरपंत पणशीकर, संजय मोने, बाळ कोल्हटकर अशा विविध कलाकारांचे संवाद इतक्या चपखलपणे म्हणून दाखवले की श्रोत्यांना जुनी नाटके आपण प्रत्यक्ष पाहत आहोत, अशी अनुभूती आली. संपूर्ण सभागृह दीड तासाहून अधिक काळ खिळून राहिले होते. हा कार्यक्रम संपूच नये असे सर्वांनाच वाटत होते. रायगडाला जेव्हा जाग येते नाटकातील शिवाजी, अश्रूंची झाली फुले, गुंतता हृदय हे नाटकातील लाल्या आणि विद्यानंद आणि अखेरच्या टप्प्यातील नटसम्राट नाटकातील कुणीही कुणाचं नसतं हे सांगणारा संवाद अप्रतिम ठरला. याशिवाय तो मी नव्हेच नाटकातील लखोबाच्या साक्षीचे प्रसंगही श्री. ठाकूर यांनी जिवंत केले. याशिवाय गाजलेल्या विविध नाटकांमधील कलावंत, अभिनय, लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य याविषयीच्या रोचक आठवणी आणि त्यावर खुसखुशीत शैलीतील विवेचन असे कार्यक्रमाचे स्वरूप होते.
कार्यक्रमाचे निवेदन सौ. तृप्ती सरदेसाई यांनी मुलाखतीच्या स्वरूपात श्री. ठाकूर यांच्याशी संवाद साधून त्यांना बोलते केले. सौ. सरदेसाई मत्स्यगंधा नाटकातील बालकवींची रचना असलेली आशालता वाबगावकर यांच्या मूळ आवाजातील गर्द सभोंती रान साजणी तू तर चाफेकळी हे नाट्यपद कोणतीही संगीतसाथ नसताना गायिले. या नाट्यगीताने मैफलीची सांगता झाली.
शिवाजीनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. संपूर्ण सभागृह तुडुंब भरले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि श्री. ठाकूर यांचा परिचय संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी करून दिला. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी आभारही मानले.
चंद्रशेखर ठाकूर यांच्या कार्यक्रमाची थोडक्यात झलक




