चिंदर (ता. मालवण) : प्राथमिक शिक्षक हा मुळातच साहित्यिक असतो. मात्र अशा प्राथमिक शिक्षकाचे पुस्तक प्रकाशित होणे ही समस्त शिक्षणप्रेमींसाठी अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन आचरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि सेवानिवृत्त शिक्षक बाबाजी भिसळे यांनी केले.
दापोलीतील प्रथितयश साहित्यिक आणि शिक्षक बाबू घाडीगावकर यांच्या ‘वणवा’ या मराठी लघुकथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. कोकण मराठी साहित्य परिषदेची मालवण शाखा, अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि गावठणवाडी-चिंदर (ता. मालवण) येथील श्री दत्तमंदिर सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार बॅ. नाथ पै यांच्या एकावन्नव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात बॅ. नाथ पै यांना अक्षरस्वरूप आदरांजली म्हणून ‘वणवा’ या मराठी लघुकथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी भूषविले. याप्रसंगी व्यासपीठावर आचरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे सचिव पांडुरंग कोचरेकर, चिंदरच्या सरपंच राजश्री कोदे, सेवानिवृत्त अधिकारी सुरेंद्र सकपाळ, त्रिंबकच्या जनता विद्या मंदिरचे मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर, ज्येष्ठ कवी, गझलकार तथा शिक्षक एकनाथ गायकवाड, दत्तमंदिर देवस्थानच्या अध्यक्ष स्मिता पाटील, चिंदर ग्रामपंचायत सदस्य दुर्वा पडवळ, सेवानिवृत्त शिक्षिका अर्चना बागवे, मालवणी कवी भूषण दत्तदास, पत्रकार राजू परब आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात बॅ. नाथ पै यांच्या जीवनचरित्रावर सुरेश ठाकूर यांनी सविस्तर विवेचन केले. बॅ. नाथ पै यांच्या जीवनातील काही अविस्मरणीय प्रसंग कथन केले.
यावेळी प्रकाशित झालेल्या बाबू घाडीगांवकर यांच्या ‘वणवा’ या कथासंग्रहात वीस लघुकथांचा समावेश आहे. कोकणातील समाजजीवन आणि लोकजीवन त्यात अधोरेखित करण्यात आले आहे. या कथासंग्रहातील प्रत्येक कथेत कोकणातील लोकजीवनाचे प्रतिबिंब दिसते, असे विवेचन श्री. भिसळे यांनी केले. याप्रसंगी एकनाथ गायकवाड, प्रवीण घाडीगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र सकपाळ यांनी केले तर एकनाथ गायकवाड यांनी आभार मानले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड