रत्नागिरीच्या लेखिका स्मिता राजवाडे यांचे निधन

रत्नागिरी : येथील सुप्रसिद्ध लेखिका स्मिता राजवाडे (वय ७४) यांचे काल (दि. १८ जानेवारी) रात्री ८ वाजता मंगळूर (कर्नाटक) येथे निधन झाले.

श्रीमती राजवाडे यांचा जन्म ३० जानेवारी १९४८ रोजी झाला. त्यांच्या पतीचे २००५ साली निधन झाले. त्यांना स्वाती, साक्षी आणि गौरी अशा तीन विवाहित कन्या आहेत. श्रीमती राजवाडे यांनी हिंदी आणि मराठी या दोन विषयांत प्रथम श्रेणीतून एमए पदवी संपादन केली. राष्ट्रभाषा पंडित, साहित्य विशारद या परीक्षाही त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमधील साहित्याचा त्यांचा गाढा व्यासंग होता. स्वा. सावरकर, कुसुमाग्रज , संत कबीर यांच्यावर त्यांनी विपुल लेखन केले. रामचरितमानस या संपूर्ण काव्याचा त्यांनी मराठीत अनुवाद केला. त्या उर्दू भाषाही शिकल्या. त्यातून त्यांनी उर्दू
साहित्याचा अभ्यास केला. तसेच उर्दू काव्यरचनाही केल्या. कादंबरी, कथा, ललित, काव्यसंग्रह, अनुवादित कवितासंग्रह, बालसाहित्य, नाटक अशी त्यांची १७ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. कोकण मराठी कोशामध्ये त्यांनी लेखन केले आहे. स्त्रीजीवन, संतसाहित्यावरील लेखनाचा त्यात समावेश आहे. गुण गुण गाणी या त्यांच्या बालसाहित्यसंग्रहाला पुण्याच्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा पुरस्कार मिळाला.

शीघ्रकाव्य हेही त्यांच्या साहित्यप्रतिभेचे वैशिष्ट्य होते. एखादा गौरव समारंभ सुरू असताना गौरवमूर्तीचे वैशिष्ट्य सांगणारे काव्य त्या त्वरित तयार करत असत आणि त्याच समारंभात ते सादर करून वाहवा मिळवत असत. रत्नागिरीतील अनेक गौरवमूर्तींनी त्याचा अनुभव घेतला आहे.

रत्नागिरीत आकाशवाणीचे केंद्र सुरू झाल्यानंतर त्यांनी विविध कार्यक्रम त्या केंद्रावर सादर केले. त्या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कवयित्री होत्या. त्यांना ए ग्रेड कलाकार म्हणून मान्यता मिळाली होती.

श्रीमती राजवाडे यांनी रत्नागिरीत पटवर्धन हायस्कूल आणि फाटक प्रशालेत काही काळ अध्यापन केले. रत्नागिरीच्या स्वातंत्र्यलक्ष्मी चौकातील जनसेवा ग्रंथालयासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले.

गेली दोन वर्षे त्या मंगळूर येथील कन्या साक्षी अभिजित शिवलकर यांच्याकडे राहायला गेल्या होत्या. तेथेच त्यांचे काल रात्री आठ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply