
आचरे (ता. मालवण) : सुरेश श्यामराव ठाकूर यांचे ‘शब्दांच्या पलीकडले’ हे पुस्तक मराठी भाषेच्या अभिजाततेचा मागोवा घेणारे ठरणार आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्राथमिक उपशिक्षणाधिकारी तथा शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्र्यांचे माजी स्वीय सहायक रामचंद्र आंगणे यांनी केले.
कोकण मराठी साहित्य परिषद आणि अ. भा. साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या ‘शब्दांच्या पलीकडले’ या पुस्तकाचे प्रकाशन आचरे येथील बा. ना. बिडये विद्यामंदिर केंद्रशाळा क्र. १ येथे झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, भाषा जेव्हा अभिजात होते, तेव्हा अनेक भाषांमधून, विविध संस्कृतीमधून वेगवेगळे शब्द आपल्या भाषेत येत असतात. अशा निवडक १११ शब्दांच्या कूळकथा आणि मूळकथा सुरेश ठाकूर यांनी या पुस्तकात चितारलेल्या आहेत. प्रत्येक विद्यामंदिरातील संदर्भ पुस्तकांच्या कपाटात हे संदर्भ पुस्तक प्रमुख स्थान पटकावणार हे निश्चित! त्यांनी पुस्तकातील विविध उदाहरणे देऊन हे संदर्भ पुस्तक विद्यार्थी, पालक, शिक्षक, लेखक, पत्रकार भाषा अभ्यासक अशा सर्वांना उपयुक्त कसे ठरेल हे स्पष्ट केले. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
समारंभाचे अध्यक्षस्थान रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरचे अध्यक्ष बाबाजी तथा तात्या भिसळे यांनी भूषविले. व्यासपीठावर ज्येष्ठ मालवणी कवी रुजारियो पिंटो, आचरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी, आचरे गावचे सरपंच जोरोन फर्नांडिस, डॉ. विनायक करंदीकर, द. शि. हिर्लेकर गुरुजी, नवीन शैक्षणिक धोरण सुकाणू समितीचे सदस्य भरत गावडे, साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आणि कवी विठ्ठल कदम, म. ल. देसाई, सुरेंद्र सकपाळ, सुगंधा गुरव, रामचंद्र कुबल, पांडुरंग कोचरेकर, अनिरुद्ध आचरेकर, गुरुनाथ ताम्हणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. ठाकूर यांनी ‘शब्दांच्या पलीकडले’ हे पुस्तक समारंभपूर्वक रामेश्वर वाचन मंदिराला अर्पण केले. यावेळी ते म्हणाले, रामेश्वर वाचन मंदिर या वाचनालयाने मला बालपणापासूनच सकस आणि चोखंदळ वाचनाचे वेड लावले. आजचे संदर्भ पुस्तक हे त्याचाच एक परिपाक आहे. त्याच माझ्या या शब्दतीर्थाला हे माझे पुस्तक अर्पण करीत आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री. भिसळे म्हणाले, आजचा दिवस माझा परमभाग्याचा आहे. वाचनालयाच्या स्थापनेपासून जे जे अध्यक्ष झाले, त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी हे पुस्तक स्वीकारत आहे. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करून सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या वाचनालयाचा मी अध्यक्ष आहे हे माझे परमभाग्य आहे.
यावेळी द. शि. हिर्लेकर गुरुजी, डॉ. विनायक करंदीकर, जोरोन फर्नांडिस, अशोक कांबळी आदींनी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शुभेच्छा दिल्या. रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला कवी रुजारियो पिंटो तसेच कवी मंदार सांबारी यांनी काव्यरूपी शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ कवी प्रमोद जोशी यांच्या कवितारूपी शुभेच्छा आणि ज्येष्ठ कोमसाप सल्लागार सदानंद कांबळी आणि ज्येष्ठ कवी गिरीधर पुजारे यांच्या साहित्यिक शुभेच्छांचे वाचन रामचंद्र कुबल यांनी केले.
कोमसापचे संस्थापक आणि ज्येष्ठ लेखक आदरणीय मधु मंगेश कर्णिक यांनी खास पत्ररूपी संदेश लिहून मौलिक शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, सुरेश ठाकूर यांनी गेली अनेक वर्षे कोमसापच्या माध्यमातून कोकणातील उमलत्या आणि उमललेल्या लेखकांना हक्काची प्रकाश खिडकी उपलब्ध करून दिली आहे. आज त्यांचे हे पुस्तक सर्वांनाच मार्गदर्शक ठरणारे आहे. मराठी शब्दांचे कूळ आणि मूळ धुंडाळण्याचा या पुस्तकात त्यांनी जो व्यासंगी प्रयत्न केला आहे, त्याचे कौतुक करावे असे वाटते. त्यांच्या उपक्रमाला माझे वडीलधारीपणाचे आशीर्वाद! ‘शब्दांच्या पलीकडले’ या पुस्तकाच्या ई-आवृत्तीचे प्रकाशन आचरे सरपंच जोरोन फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन सुरेंद्र सकपाळ यांनी केले. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या आशीर्वादाचे पत्र अनघा कदम यांनी वाचून दाखवले. मनातले दोन शब्द हा पुस्तकातील भाग मधुरा माणगावकर यांनी वाचून दाखवला. प्रार्थनागीत रश्मी आंगणे यांनी सादर केले. सूत्रसंचालन रामचंद्र कुबल, प्रास्ताविक गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले. सुगंधा गुरव यांनी आभार मानले.
समारंभाला नितीन वाळके, चारुशीला देऊलकर, प्रकाश पेडणेकर, लक्ष्मणराव आचरेकर, स्मिता बर्डे, प्रमोद कोयंडे, रामचंद्र वालावलकर, सुरेश गावकर, कल्पना मलये, विजय चौकेकर आदी मान्यवरांसह कोमसाप, साने गुरुजी कथामाला, रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरे शाळा क्र. १ आदी संस्थांचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. आचरे पंचक्रोशीतील बहुसंख्य साहित्य रसिक समारंभाला आवर्जून उपस्थित होते.
ई-बुक लिंक : अँड्रॉइडसाठी :
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

