रत्नागिरी : महावितरणकडून राज्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (Time of Day) मीटरच्या माध्यमातून नवा अध्याय सुरू झाला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रति युनिट ८० पैसे ते एक रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीजदरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा एक जुलैपासून सुरू झाला आहे. या अंतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (रत्नागिरी परिमंडळ) एक लाख ८३ हजार ७३७ वीज ग्राहकांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत मिळून एकूण १९ लाख ६६ हजार इतक्या रुपयांची सवलत मिळाली आहे. महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.
स्मार्ट टीओडी मीटरमुळे जुलै महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातील ४८ हजार ४८१ ग्राहकांना तीन लाख २० हजारांची, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ हजार १२५ ग्राहकांना ६७ हजार रुपयांची सवलत मिळाली आहे. ऑगस्ट महिन्यात वीज ग्राहकांना मिळालेली सवलत वाढली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ९१ हजार ३५९ ग्राहकांना ११ लाख ८१ हजारांची, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३१ हजार ७७२ ग्राहकांना तीन लाख ९७ हजार रुपयांची सवलत मिळाली आहे. दोन्ही महिन्यांचा एकत्रित विचार करता रत्नागिरी जिल्ह्यातील एक लाख ३९ हजार ८४० ग्राहकांना १५ लाख एक हजाराची, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३ हजार ८९७ ग्राहकांना चार लाख ६५ हजार रुपयांची सवलत मिळाली आहे. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरमधून स्वयंचलित मासिक रीडिंग होत असल्याने अचूक बिले मिळतात आणि घरातील विजेचा वापर दर अर्ध्या तासाला संबंधित ग्राहकांना मोबाइलवर पाहता येतो. त्यामुळे वीज वापरावरदेखील ग्राहकांचे थेट नियंत्रण राहत आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, गीझर, इस्त्री, एअर कंडिशनर व जास्त वीज वापर असणाऱ्या इतर उपकरणांचा वापर करू शकतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होत आहे.
टाइम ऑफ डे प्रणालीमध्ये वीजवापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिक ग्राहकानंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीजदरासाठी टीओडी प्रमाणे आकारणी सुरू झाली आहे. २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी टाइम ऑफ डे (टीओडी) प्रणालीनुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट ८० पैसे ते एक रुपया सवलत मंजूर केली आहे. यात एक जुलै २०२५ ते मार्च २०२६ मध्ये ८० पैसे, २०२७ मध्ये ८५ पैसे, सन २०२८ व २९ मध्ये ९० पैसे, तसेच सन २०३० मध्ये एक रुपया प्रति युनिट सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट टीओडी मीटर घरगुती ग्राहकांकडे बसवणे आवश्यक आहे.
स्मार्ट टीओडी मीटरचे मासिक रीडिंग स्वयंचलित होणार आहे. कोणताही मानवी हस्तक्षेप नसल्याने बिलिंगच्या तक्रारी जवळपास संपुष्टात येणार आहेत. तसेच घरात किती वीज वापरली, याची माहिती सर्व माहिती संबंधित ग्राहकाला मोबाइल ॲपवर उपलब्ध होत आहे. त्यामुळे ग्राहकांना वीज वापराचे योग्य नियोजन करता येईल. यासह ज्यांच्याकडे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प आहे त्यातून वापरलेल्या व शिल्लक राहिलेल्या विजेचा लेखाजोखा ठेवणे हे या स्मार्ट टीओडी मीटरचे प्रमुख फायदे आहेत. या नव्या मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड ग्राहकांवर नाही. स्मार्ट टीओडी मीटर प्रीपेड नाही, तर पोस्टपेड आहे. म्हणजेच आधी वीज वापरा मग मासिक बिल भरा अशी सध्याची मासिक बिलिंग पद्धत पुढेही सुरू राहणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

