कोकणात तीन नव्या जेटींना परवानगी; दोन रत्नागिरीत, तर एक सिंधुदुर्गात

रत्नागिरी : कोकणात तीन नव्या जेटी उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली असून, महाराष्ट्र सागरी प्राधिकरणाकडून सीआरझेडसंदर्भातील मंजुरीही मिळाली आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. कोकणातील पर्यटन आणि मासेमारी व्यवसायाच्या वाढीसाठी आणि त्याला अधिक चालना देण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातल्या देवाचे गोठणे गावात करंबेळकरवाडी इथे आणि दापोली तालुक्यात उटंबर इथे जेटी उभारली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातल्या पेंडूरमध्येही जेटी उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. या तिन्ही जेटींचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठवण्यात आले आहेत. मासेमारी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी जेटी अत्यंत महत्त्वाच्या असून, या जेटींमुळे मासेमारी नौका, प्रवासी बोटी आणि रो-रो जहाजे यांना सुरक्षित थांबा मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांची तसेच मालाची वाहतूक अधिक सोयीस्कररीत्या करता येणार आहे.

कोकणात मासेमारीबरोबर पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा बंदराचा विकास करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नीतेश राणे यांनी खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत. मत्स्यव्यवसायाला जलपर्यटनाची जोड देण्यात येत आहे. किनारपट्टीवर सोयीसुविधा बळकट केल्या तर त्याचा फायदा होईल हे लक्षात घेऊन त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोकणच्या किनारपट्टीवर नव्याने जेटी उभ्या राहिल्यास कोकणचा आर्थिक विकास साधला जाणार आहे. या तीन नव्या जेटींमुळे कोकणातील किनारपट्टीवरील पर्यटनवृद्धी होणार असून, पर्यटनातून आर्थिक विकास होण्यास चालना मिळणार आहे. यातून स्थानिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. या जेटींच्या माध्यमातून कोकण आणि मुंबई पुन्हा एकदा सागरी मार्गाने जोडले जाऊन यामुळे प्रवासखर्च आणि वेळ दोन्हींची बचत होणार आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply