रत्नागिरी : पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागातर्फे ‘कोकण क्षेत्राचा शाश्वत आणि सर्वंकष विकास’ या विषयावर आज (दि. २९ फेब्रुवारी) आयोजित केलेल्या ‘वार्तालाप’ या एकदिवसीय ग्रामीण माध्यम परिषदेला रत्नागिरीतील पत्रकारांचा चांगला प्रतिसाद लाभला.
भारतीय तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक गिरीश चंदर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, पर्यटन मंत्रालयाचे प्रादेशिक संचालक डी. व्यंकटेशन, कौशल्य विकास मंत्रालयाचे संयुक्त संचालक अभय महिषी, पत्रसूचना कार्यालयाच्या उपसंचालक जयदेवी पुजारी-स्वामी आणि सहायक संचालक निकिता जोशी यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन झाले. शासकीय विश्रागृहासमोरील हॉटेल सिल्व्हर स्वान येथे ही परिषद झाली.
कोकणातील लोकही माहितीने परिपूर्ण असून त्यांना अद्ययावत माहिती असते, हे इथे काम करताना निदर्शनाला आले आहे. त्यामुळे प्रशासनाचे कामही एक पाऊल पुढे असायला हवे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी यावेळी केले. शासकीय योजना तळागाळात प्रभावीपणे पोचवण्यात पत्रकारांचा मोठा वाटा आहे. जिल्हा परिषदेमार्फत विविध योजनांची अंमबजावणी केली जाते. मात्र काहीवेळा प्रशासनही गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. अशावेळी माध्यमांचीही मोठी मदत होते. प्रशासन समाजमाध्यमांद्वारे लोकांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. तंत्रज्ञानामुळे वेगाने बातमी पसरते; मात्र ती खरी आहे की खोटी याची पडताळणी करूनच ती फॉर्वर्ड करायला हवी. तंत्रज्ञानाचा वापर करून चांगली आणि उपयोगी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, अशी सूचनाही श्री. पुजार यांनी केली.
भारतीय तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक गिरीश चंदर यांनी आपला माध्यमांशी संवाद चांगला असेल तर गरज पडेल तेव्हा आपले नियोजन कार्यान्वित करण्यासाठी आपल्याला त्यांची चांगली मदत होऊ शकते, असे सांगितले.
प्रास्ताविकात पत्र सूचना कार्यालयाच्या जयदेवी पुजारी-स्वामी यांनी कार्यालयाच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. सहायक संचालक निकिता जोशी यांनी आभार मानले.
उद्घाटनानंतर झालेल्या सत्रात समुद्रातील जीवांच्या सुरक्षिततेला प्रोत्साहन या विषयावर भारतीय तटरक्षक दलाचे पश्चिम विभागाचे जनसंपर्क अधिकारी कमांडंट राजेश धोलखंडी यांच्या उपस्थितीत तटरक्षक दलातर्फे सादरीकरण करण्यात आले. असिस्टंट कमांडंट मनीष सिंग यांनी मच्छिमार आणि किनारपट्टी भागातल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी तटरक्षक दलाकडून कसे प्रयत्न केले जातात, याबद्दलचे सादरीकरण केले.
शाश्वत स्थानिक उपक्रमांद्वारे कोकणातल्या पर्यटन क्षमतेचा अधिकाधिक वापर कसा करता येईल याविषयी पर्यटन मंत्रालयाचे प्रादेशिक संचालक डी. व्यंकटेशन यांचे सादरीकरण झाले. पर्यटन मंत्रालय ग्रामीण पर्यटन विकासासाठी करत असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या अपार क्षमता असून आगामी काळात त्यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी स्थानिक पत्रकारांनीही पर्यटनदृष्ट्या स्थानिक महत्त्वाच्या स्थळांची माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले. पर्यटन हा प्रत्येक व्यवसायाचा भाग आहे. पर्यटनातून अनेक रोजगार-व्यवसायाला चालना मिळतो, असेही ते म्हणाले. यावेळी रत्नागिरीतील सण, उत्सव तसेच अनेक वारसास्थळे दुर्लक्षित असल्याचा प्रश्न रत्नागिरीतील पत्रकारांनी मांडला. जिल्ह्यात केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे केंद्र व्हावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली गेली. यासंदर्भात तातडीने निर्णय घेतला जाईल. राज्य पर्यटन विकास महामंडळाशी आणखी समन्वय साधला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. मंत्रालयाच्या पर्यटन सूचना अधिकारी गौरी आपटे यांनीही यावेळी माहिती दिली. असिस्टंट डायरेक्टर सतरूपा दत्ता यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
कोकणात उपजीविकानिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास कसा महत्त्वाचा ठरेल, याबद्दलचे विचार अभय महिषी यांनी मांडले. केंद्र सरकारने १९५६ साली स्थापन झालेल्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या २०१४ नंतर झालेल्या बदलांचा आणि स्थित्यंतराचा आढावा त्यांनी घेतला. या मंत्रालयांतर्गत कौशल्य विकास विभागामार्फत विविध चार प्रकारचे कार्य कसे चालते, छोटे-मोठे अभ्यासक्रम आणि परीक्षा घेण्याची पद्धत, रोजगार मिळविणाऱ्यांपासून रोजगार देणाऱ्यांपर्यंत विभागामार्फत कोणते उपक्रम राबविले जातात, याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
पत्र सूचना कार्यालयाच्या कामकाजाची माहिती उपसंचालक जयदेवी पुजारी स्वामी आणि सहायक उपसंचालक निकिता जोशी यांनी दिली. ग्रामीण भागातील माध्यमांचे विकासात्मक संवादात योगदान आणि जनसेवेसाठी माध्यमांना पीआयबीची कशी मदत होईल, केंद्र सरकारतर्फे पत्रकारांना अर्थसाह्य केल्या जाणाऱ्या कोणत्या योजना आहेत, पी आय बी फॅक्ट चेक म्हणजे काय, याची माहितीही यावेळी देण्यात आली.
अखेरच्या सत्रात विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले. रेल्वे मंत्रालयाच्या एक स्थानक एक उत्पादन योजनेत रत्नागिरीतील ३३ उद्योजकांना संधी मिळाली आहे. प्राचीन कोकणचे वैभव सरदेसाई यांनी या योजनेमुळे आपल्या लाकडी खेळणी उत्पादनाला देशभरातील ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे यावेळी सांगितले. याच योजनेच्या लाभार्थी फणसोप (ता. रत्नागिरी) येथील जान्हवी भुरवणे यांनी त्यांच्या रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील समर्थ फूड्स या कोकणी मेव्याचा स्टॉलचा अनुभव सांगितला. त्यांच्या खाद्य पदार्थांना परजिल्ह्यात आणि राज्यातही मोठी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
सौ. संयुक्ता संतोष गुजर (धामणवणे, ता. चिपळूण) या केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घेतलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या लखपती दीदी ठरल्या आहेत. त्यांनी १२ महिलांसह चालवलेल्या सखी समूहाविषयी माहिती दिली. या महिला नाचणीपासून पाच प्रि मिक्स तयार करतात.
नारळ संशोधन केंद्राच्या उपक्रमांचा गुहागरमध्ये अनुसूचित जातीच्या १६३ लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे, असे केंद्राचे श्री. मालशे यांनी सांगितले. या केंद्रातून नारळ काढणीचे प्रशिक्षण घेतलेल्या नारळ मित्र प्रियांका नागवेकर आणि शाम्भवी नागवेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
केंद्र सरकारच्या जल जीवन मिशनचा लाभ इंदवटी (ता. लांजा) येथील बचत गटातील महिलांना योजना चालवण्यासाठी देऊन एक नवीन उपक्रम राबवून देण्यात आला. शंभर कुटुंबांच्या या गावातील ३४ बचत गटातील महिलांना मार्गदर्शन देण्यात आले. या महिला आता पाणी स्वच्छता, पाणीपट्टी वसुली, पाणी वितरण व्यवस्था ही काम करतात. नळ योजनेतून गावातील महिला आणि पुरुषांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सरपंच विनोद गुरव यांनी आपले अनुभव सांगितले.
सरकारच्या योजना आणि उपक्रम नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी पत्रकारांना त्याविषयी अधिक माहिती होण्याच्या दृष्टीने असे उपक्रम सातत्याने होणे आवश्यक असल्याची प्रातिनिधिक भावना यावेळी व्यक्त झाली.











कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

