सोडून दिलेला सुसंस्कृतपणा

मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी पुकारलेले आंदोलन आणि त्यांनी आंदोलनाच्या काळात राजकीय नेत्यांना वापरलेले अपशब्द हा सध्या मोठा चर्चेचा विषय झाला आहे. मराठा समाजाविषयी त्यांना वाटत असलेली कळकळ कितीही आतून असली तरी कोणत्याही आंदोलनाच्या बाबतीत संयमितपणा आवश्यक असतो. त्याबाबत सातत्याने सत्ताधारी नेत्यांनी त्यांना सूचना केली असली तरी त्याचा त्यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही. ते सातत्याने अत्यंत हीन भाषेत टीका करत राहिले. अत्यंत मोठ्या समाजाच्या मोठ्या बनलेल्या नेत्यांनी अशी भाषा वापरल्यामुळे असंस्कृतपणाचे दर्शन घडले आहे. अशा वक्तव्यांचा उपयोग होतो की नाही हे सांगता येणार नाही. पण समाजमनावर दुष्परिणाम मात्र नक्की होतो, हे सांगता येऊ शकते. सुसंस्कृतपणाची मोठी परंपरा असल्याचे सांगितले जात असलेल्या महाराष्ट्रात अशी भाषा शोभनीय नाही. मराठी भाषा गौरव दिनाच्या आसपासच अशी वक्तव्ये होणे हे तर मराठीचे आणि महाराष्ट्राचेही दुर्दैव आहे.

ही भाषा केवळ विदर्भ आणि मराठवाड्यातच घुमते, असे नाही, तर कोकणातही अलीकडच्या काळात अशा असंस्कृत भाषेचा सर्रास वापर होऊ लागला आहे. परस्परविरोधी पक्षांच्या नेत्यांबद्दल उमदेपणा दाखविण्याचा इतिहास असलेल्या कोकणात अलीकडे ठरावीक नेतेच असंस्कृतपणाचे दर्शन घडवत आहेत. त्याचे दुष्परिणाम संपूर्ण समाजावर होत असतात. कोकणवासीयांवर होत असतात. चारचौघांत न बोलण्यासारखी भाषा जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणविल्या जाणाऱ्या नेत्यांकडून व्यासपीठावर उच्चारली जाते, तेव्हा संबंधित नेत्यांची सर्वसामान्य लोकांच्या मनातील प्रतिमा पूर्णपणे मलीन होऊन जाते. निष्कलंक चारित्र्याच्या नेतृत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या कोकणाला हा मोठाच कलंक आहे.

मुळात अशी असभ्य भाषा वापरण्याची वेळ का येते, हाच प्रश्न आहे. एकमेकांबद्दल आकस असू शकतो. परस्परांची मते एकमेकांना न पटण्याची स्थितीही अनेक वेळा निर्माण होते. वेगवेगळ्या पक्षांची मते आणि धोरणे वेगळी असल्यामुळे विरोधातल्या पक्षाची आणि नेत्यांची धोरणे एकमेकांना पटण्याची शक्यता नसते, पण अत्यंत सभ्य, सुसंस्कृत भाषेमध्ये हे एकमेकांना सांगितले जाऊ शकते. पण ज्या भाषेत ही अश्लाघ्य वक्तव्ये केली जात आहेत, ती पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या धोरणांबद्दल नसून व्यक्तिगत आकासाची आहेत. अशा तऱ्हेचा व्यक्तिगत आकस जाहीर सभांमधून व्यक्त केला जातो, तेव्हा अशा नेत्यांबद्दल घृणा निर्माण होते. आपण तेवढे बरोबर समोरचा चुकीचा, असे जाहीर सभेत सांगितले जाते, ते ठीक आहे. पण त्यासाठी असभ्य भाषा कशाला? सभेला उपस्थित असणाऱ्या निम्म्याअधिक श्रोत्यांनाही ती भाषा आवडली असण्याची शक्यता नसते. लोकशाहीमध्ये मतस्वातंत्र्य असले तरी सार्वजनिक ठिकाणी कसे वक्तव्य करावे, सभ्यतेची बंधने कशी पाळावीत, हे जर या नेत्यांना समजत नसेल तर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे स्वातंत्र्य मतदारांना आहे. नाइलाजाने हा निषेध व्यक्त करण्यासाठी पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकांची वाट पाहावी लागते. अशा रीतीने मतदारांना एकदाच मतपेटीतून निषेध व्यक्त करता येतो. पण ते निवडणुकीतील उमेदवारांच्या बाबतीत करता येते. जे निवडणुकीच्या रिंगणातच नाहीत, तरीही लोकप्रिय मानले जातात अशा पक्षनेत्यांनी ताळतंत्र सोडून भाषणे केली, तर त्यांच्या बाबतीत काय करावे याचे उत्तर जनतेकडे नाही. अशा नेत्यांच्या सभांवर बहिष्कार घातला जाऊ शकतो. पण मनाची तेवढी तयारी आणि ठामपणा सर्वसामान्य लोकांमध्ये नाही ही शोकांतिका आहे. त्यात बदल होईपर्यंत अश्लाघ्य आणि असंस्कृत भाषणे लोकांना ऐकावी लागणार आहेत. मनाची लाज नसलेल्या या लोकांना जनांनीच बहिष्काराचे हत्यार उपसून आपल्या सुसंस्कृतपणाचे दर्शन घडविले पाहिजे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १ मार्च २०२४)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply