रत्नागिरी : श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त येथील रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे येत्या रविवारी (दि. ३ मार्च) गजानन सायकल फेरी आयोजित करण्यात आली आहे.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने गेली तीन वर्षे विविध विषयांसाठी सायकल फेरी, सायकल संमेलन, सायकल स्पर्धा अशा उपक्रमांचे आयोजन केले आहे. रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरात सायकल चळवळ वाढावी म्हणून क्लबने भरपूर प्रयत्न केले आहेत. त्यासाठी विधी दिन, स्वस्थ इंडिया सायकल राइड, मतदार जनजागृती सायकल फेरी, हर घर तिरंगा सायकल फेरी, अयोध्येत श्रीराम मंदिर स्थापनेनिमित्त सायकल फेरी अशा अनेक फेऱ्यांचे यशस्वी आयोजन केले आहे. रत्नागिरीत सायकल चालवणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढली आहे.
याच अनुषंगाने श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सायकल फेरी आयोजित केली आहे. नाचणे पॉवरहाऊस येथील श्री गजानन महाराज मंदिर ते गोळप येथील श्री गजानन महाराज मंदिरपर्यंत ही सायकल फेरी निघेल. रविवारी सकाळी ६.१५ वाजता नाचणे, पॉवर हाऊस येथील श्री गजानन मंदिर येथून फेरीला सुरवात होईल. ही फेरी मारुती मंदिरमार्गे जयस्तंभ येथे ६.३० वाजता पोहोचेल. तेथून शहरातील खालच्या भागातील सायकलस्वार सहभागी होतील. त्यानंतर ही फेरी मुख्य मार्गावरून भाट्ये, कुर्ली फाटा, कसोप फाटा, वायंगणी फाटा, जोशी कंपाउंड, कोळंबे फाटा, फिनोलेक्स फाटा मार्गे गोळप येथील श्री गजानन महाराज मंदिरात पोहोचणार आहे. हे अंतर साधारण २८ किमी आहे.
सायकलस्वारांनी येताना सोबत शेंगदाणा चिक्की, पाण्याची बाटली आणावी. जास्तीत जास्त सायकलस्वारांनी या फेरीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने केले आहे. अधिक माहितीसाठी अमित कवितके (8275655111), दर्शन जाधव (9970398242), डॉ. नितीन सनगर (9689866099), महेश सावंत (7744085581), आरती पानवलकर (9867433796) किंवा श्रद्धा रहाटे (8806424256) यांच्याशी संपर्क साधावा.
सायकल चालवणे हेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे शुल्क
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनाचे यशस्वी आयोजन केल्यानंतर अनेक सायकलिस्ट आता रत्नागिरीच्या रस्त्यावर दिसू लागले आहेत. रत्नागिरीत शंभराहून अधिक सायकलस्वार क्लबचे सदस्य असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. क्लबचे सदस्यत्व घेण्याकरिता आठवड्याला किमान ७५ आणि महिन्याला किमान ३०० किमान किलोमीटर सायकल चालवण्याचे अनोखे शुल्क आकारले जाते. रत्नागिरीत सायकलसंस्कृती वृद्धिंगत व्हावी, यासाठी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब अनेकविध उपक्रम राबवत आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

