आज रामदास स्वामींची पुण्यतिथी म्हणजेच दासनवमी. रामदास स्वामींनी आपल्या दासबोधामध्ये गुंतवणूक कशाकशामध्ये करावी, यासंबंधी अनेक प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. आपण मात्र गुंतवणूक म्हणजे आर्थिक गुंतवणूक एवढेच समजतो. पण रामदास स्वामींनी सांगितलेली गुंतवणूक कोणकोणत्या प्रकारची आहे, हे थोडक्यात येथे सांगू इच्छितो.
श्रवणातील गुंतवणूक – दुसरा मनुष्य जे सांगतो ते ऐकणे म्हणजे श्रवण! सांगितलेले नीटपणे ऐकून घेतले आणि त्याच्या योग्य ठिकाणी वापर केला, तर श्रवणातील गुंतवणूक आपल्याला कायमस्वरूपी मार्गदर्शक ठरू शकते!
प्रपंचातील गुंतवणूक – कुटुंबाची प्रगती साधण्यासाठी कौटुंबिक पातळीवर आर्थिक आणि इतर सर्व बाबींचे नियोजन योग्यरीत्या केले तर प्रपंचातील गुंतवणूकसुद्धा आपल्याला खूप फायदेशीर ठरू शकते!
सुवर्णातील गुंतवणूक – खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने आणि आकस्मिक निधी उभा करण्याच्या दृष्टीनेसुद्धा सुवर्ण खरेदी करावी, असे रामदास स्वामींनी ४०० वर्षांपूर्वी सांगितले आहे. आजही ती गोष्ट काळाच्या कसोटीवर सत्य ठरलेली दिसते. मात्र ही गुंतवणूक सध्या प्रत्यक्ष सोन्याचे दागिने खरेदी करण्यापेक्षा गोल्ड बॉण्डच्या स्वरूपात किंवा डीजी गोल्डच्या स्वरूपात करणे खूप फायदेशीर ठरू शकते!
आरोग्यातील गुंतवणूक – आरोग्य चांगले राहिले तर आपण सर्वच भौतिक सुख उपभोगू शकतो. त्यादृष्टीने व्यायामाचे महत्त्व आहेच, पण सध्याच्या जगात आरोग्य विमा घेऊन आजारपणातील खर्चावर बंधन ठेवणे आपल्याला सहज सोपे होऊ शकते!
नोकरी-व्यवसायातील गुंतवणूक – ज्या ठिकाणी आपण नोकरी करतो तेथे आपण मनःपूर्वक काम करणे खूप महत्त्वाचे असते. कामासाठी ज्या ज्या गोष्टी शिकणे, कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे, त्या गोष्टी शिकणे खूप महत्त्वाचे आहे. हे शिक्षण व्यावसायिक शिक्षणात मोडत असले तरी कायम शिकत राहणे खूप महत्त्वाचे असते. अशा शिक्षणातूनच आपण आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने पार पाडू शकतो. म्हणून नोकरी आणि व्यवसाय शिक्षण यातील वेळेची गुंतवणूक आणि अभ्यास करण्याची गुंतवणूक खूप महत्त्वाची ठरते!
या सगळ्या गोष्टींना महत्त्व दिल्यास आपली स्वप्ने सहज साकार होऊ शकतात. यासाठी आपण करीत असलेले प्रत्येक काम गुंतवणूक म्हणून केल्यास आपण एक यशस्वी आयुष्य जगू शकू! दासनवमीचा हाही एक संदेश आहे.
- प्रदीप जोशी, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
- (संपर्क – 9422429103)

