Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

वल्लभभाई पटेल म्हणजे आधुनिक अगस्ती – आफळेबुवा

Advertisements

रत्नागिरी : रामायणकाळात विंध्यपर्वताच्या दक्षिण भागातील अनेक राज्ये अखंड भारताला जोडून घेण्याचे अजोड कार्य अगस्ती ऋषींनी केले होते. स्वतंत्र भारतात संस्थाने खालसा करून ती भारतात विलीन करून घेण्याचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. त्यामुळे ते आधुनिक अगस्तीच आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.

येथे रत्नागिरी सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी रामकथेवर विवेचन करताना ते बोलत होते. गीतरामायणातील गीतांचे गायन आणि त्यावरील विवेचन अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे. आफळे बुवांनी रामायणकाळातील अनेक मुद्दे आपल्या ओघवत्या मांडले. ते म्हणाले की, अगस्ती ऋषींनी बॅटरीचा शोध सर्वप्रथम लावला. विज्ञान आणि अध्यात्म यादृष्टीने ते अत्यंत प्रगत होते आणि देश जोडण्याच्या बाबतीत ते क्रांतिकारकही होते.

बुवांनी यावेळी रामायणाच्या अरण्यकांडातील विविध कथा सांगितल्या. ऋषीमुनींचे शस्त्रांविषयीचे संशोधन, प्रयोगशीलता, भविष्याचा वेध घेण्याचे तंत्र इत्यादींविषयीचे अनेक दाखलेही त्यांनी दिले.

यावेळी गीतरामायणातील मागणे हे एक रामा, आपुल्या द्या पादुका, कोण तू कुठला राजकुमार, सूड घे त्याचा लंकापती, मज आणुनी द्या तो हरिण अयोध्यानाथा, पळविली रावणे सीत ही गीते अभिजित पंचभाई यांनी सादर केली. त्यांना प्रसाद करंबेळकर (तबला), दीप्ती कुलकर्णी (हार्मोनियम), मनोज भांडवलकर (पखवाज), प्रज्ञा देसाई (व्हायोलिन) हरेश केळकर, वज्रांग आफळे (तालवाद्य), सावनी नाटेकर (गायन) यांनी साथ केली.

कार्यक्रमात कीर्तनसंध्या परिवारातर्फे समाजात विविध प्रकारचे कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात आर्यक सोल्युशन्सचे प्रशांत आचार्य आणि ऋषिकेश सरपोतदार यांचा समावेश होता. त्यांनी विविध प्रकारच्या व्यावसायिक गरजांसाठी सॉफ्टवेअर बनविणारी कंपनी २०१२ साली सुरू केली. छोट्या दुकानदारांना सॉफ्टवेअर सेवा पुरवण्यापासून सुरू झालेला प्रवास आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणि उत्पादक कंपन्यांना सॉफ्टवेअर सोल्यूशन्स देण्यापर्यंत पोहोचला आहे. जगभरातील दहापेक्षा जास्त देशांमधील ग्राहक आर्यक सोल्युशन्सचा लाभ घेत आहेत आणि रोज १०० पेक्षा जास्त देशांमधील यूजर्स आर्यकने विकसित केलेली सॉफ्टवेअर वापरतात. डिजिटल भारतामध्ये आपली मंदिरे सुरक्षा तंत्रज्ञानयुक्त झाली पाहिजेत, या उद्देशाने कंपनीने समर्पण नावाचे अॅप विकसित केले आहे. तेथे मंदिर संस्था आपली नोंदणी करवून घेऊ शकतात. स्वयंचलित पद्धतीने मंदिराच्या संस्थेपर्यंत देणगी पोहोचवू शकतात. या कार्यासाठी त्या दोघांचा सन्मान आफळे बुवांच्या हस्ते करण्यात आला.

डॉ. अक्षय फाटक यांनी फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची हॅक झालेली ३१८ अकाउंट पुन्हा रिकव्हर करून दिली. त्याचा कोणताही मोबदला न घेता ज्यांना मोबदला द्यायचा असेल, त्यांनी आशादीप या मतिमंदांच्या संस्थेला देणगी द्यावी, असे त्यांनी सुचविले. त्यानुसार आतापर्यंत ४८ हजार १५३ रुपयांची मदत संस्थेला देण्यात आली. हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे यांनी स्वतःकडून पाच हजार रुपयांची देणगी जाहीर केली. याशिवाय डॉ. फाटक यांनी ९ जून २०२२ ते ८ जून २०२३ या वर्षभरात रोज एका नव्या मंदिरात जाण्याचा संकल्प करून ३६५ मंदिरांना भेट दिली. त्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला.

याशिवाय कीर्तनसंध्या परिवारातर्फे आयोजित केलेल्या ऑनलाइन प्रश्नमंजूषा स्पर्धेत यशस्वी झालेल्यांचा सन्मानही करण्यात आला. त्यात सौ. सोनाली प्रवीण कदम (रत्नागिरी गडकोट समिती), राजेश लक्ष्मण कोकरे (कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ) अद्वैत मंगेश मोरे (विद्यार्थी) आणि सौ. वीणा विवेक देवस्थळी (गृहिणी) यांचा समावेश होता. प्रमाणपत्र, पुष्प आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version