उदयोन्मुख चित्रकारांची चित्रे खरेदी करावीत : गणेश कळसकर, प्रज्ञा इंगवले

चिपळूण : उदयोन्मुख चित्रकारांची चित्रे खरेदी करावीत. किमान आपण प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला एखादे चित्र घ्यावे, अशी सूचना प्रख्यात चित्रकार गणेश कळसकर आणि प्रज्ञा इंगवले यांनी केली.

चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, संस्कार भारती आणि हौशी चित्रकार संघटनेतर्फे गणेश कोंडिराम कळसकर आणि प्रज्ञा अरुण इंगवले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात लेखक-पत्रकार धीरज वाटेकर यांनी या चित्रकारांची रंगतदार मुलाखत घेतली. मुलाखतीत वाटेकर यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना दोन्ही चित्रकारांनी दिलेल्या उत्तरांनी ही मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली.

श्री. कळसकर म्हणाले, बीड जिल्ह्यातील मूळ गावातून चित्रकार म्हणून कारकीर्द करणारा मी पहिला आहे. आमच्या कुटुंबाला सुतारकामाचा म्हणजेच कलेचा वारसा लाभलेला आहे. शालेय जीवनात सातवीपर्यंत चित्रकलेला खूप विरोध झाला होता. शाळेतील चित्रकलेचे शिक्षक बीडचे अब्दुल गफार यांनी माझ्यातील चित्रकार खूप लवकर ओळखला होता. ते मला नेहमी म्हणायचे, ‘तुला कार्पेंटर नव्हे पेंटर बनायचे आहे.’ शालेय चित्रकला परीक्षांची फीही सरांनी कधी कोणाकडून घेतली नाही. शाळेतील योग्य विद्यार्थी निवडून त्यांना चित्रकला परीक्षेला ते बसवायचे. अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटून विद्यार्थ्यांमधील चित्रकलेच्या गुणाविषयी सांगायचे. चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी गफार सरांनी शाळेत स्वतंत्र स्टुडिओ तयार केल्याची आठवण सांगितली. बीडमधून पुण्यात अभिनव कला महाविद्यालयात शिक्षण घ्यायला येईपर्यंत पूर्णपणे चित्रकलेला वाहिलेलेही कॉलेज असते याची आपल्याला कल्पनाही नव्हती, असे कळसकर यांनी नम्रपणे नमूद केले.

कॉलेजात शिकतानाच्या काळात कळसकर यांचा स्वभाव बंडखोर चित्रकाराचा होता. त्याची झलक त्यांच्या चित्रातही दिसायची. कॉलेजातील शिक्षक नेहमी सांगायचे, ‘कॉलेज फक्त तंत्र शिकवते. चित्रकार बनवत नाही. शिकवलेल्या तंत्राचा उपयोग करून तुम्ही चित्रकार बनायचे असते.’ आपल्या चित्रकलेच्या प्रवासात ‘संस्कार भारती’ची खूप मदत झालेली आहे. माझ्यातील चित्रकाराला एक व्यक्ती म्हणून समाजासमोर उभे करण्याचे काम ‘संस्कार भारती’ने केले आहे, असेही कळसकर म्हणाले.

चित्रकारांच्या शैलीदार जगण्यामुळे चित्रकार आणि समाज यांच्यात अंतर निर्माण झाल्याची खंत व्यक्त करून हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न नवीन पिढीचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला करायचे असल्याचे कळसकर यांनी सांगितले. कोणतेही चित्र घडवताना ती आपली शेवटची कलाकृती आहे, अशा विचाराने आपण चित्र काढत असल्याचे कळसकर यांनी सांगितले.

उत्तम समाजभान जपणाऱ्या घरातील संस्कारांचा आपल्यावर प्रभाव असल्याचे प्रज्ञा इंगवले यांनी नमूद केले. चित्रकलेची आवड असूनही कलेच्या प्राचीन वारशाची जोपासना, जीर्णोद्धार हाही विषय विशेष काम करण्याचा असल्याचे एका व्याख्यानातून समजल्यावर त्या क्षेत्राची आवड निर्माण झाल्याचे सांगितले. पुण्याच्या अभिनवमध्ये शिकताना याच दृष्टीने शिक्षण घेतले. त्यामुळे प्रयत्न करून नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालय संस्थानमध्ये मास्टर डिग्री कोर्ससाठी प्रवेश घेता आला. देशात खूप जुनी संग्रहालये आहेत, नव्याने होत आहेत. यातील वस्तूंच्या जतनीकरणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसे शिक्षण घेतलेल्या व्यक्तींची नियुक्ती संग्रहालयात होणे आवश्यक आहे. दुर्मीळ चित्रांचा जीर्णोद्धार करण्याची प्रक्रिया प्रज्ञा इंगवले यांनी मुलाखतीतून उलगडून सांगितली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply