Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

कोल्हापूरचा सिद्धेश पाटील कुंभार्ली घाटाचा राजा

bicycle lane on gray concrete road

Photo by Pixabay on Pexels.com

Advertisements

रत्नागिरी : चिपळूण सायकलिंग क्लबने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेत कोल्हापूरच्या सिद्धेश पाटीलने कुंभार्ली घाटाचा राजा किताब पटकावला.

कुंभार्ली घाटाचा राजा सायकल स्पर्धा सलग तिसऱ्या वर्षी ५ मे रोजी आयोजित करण्यात आली होती. पुरुष खुल्या गटात कोल्हापूरचा सिद्धेश पाटील याने १२ किलोमीटरचा कुंभार्ली घाट फक्त ३६ मिनिटे ४ सेकंदांमध्ये पार केला, तर संपूर्ण स्पर्धेच्या २९ किलोमीटर अंतरासाठी त्याला १ तास २ मिनिटे ४१ सेकंद एवढा वेळ लागला. ही स्पर्धा जिंकून तो कुंभार्ली घाटाचा राजा किताबाचा मानकरी ठरला. गेली २ वर्षे तो या स्पर्धेत सतत दुसऱ्या स्थानावर राहत होता. यंदा त्याने हा किताब आपल्या नावे करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

यंदा देश-विदेशातून मिळून एकूण ३२० सायकलपटू सहभागी झाले होते. जवळपास २० हून अधिक राष्ट्रीय ४, आंतरराष्ट्रीय, तर २५ हून अधिक राज्य स्तरावरील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सायकलिंगमधील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या ३ खेळाडूंचादेखील यात समावेश होता. स्पर्धा ५ श्रेणींमध्ये विभागली गेली होती.

स्पर्धेचा सविस्तर निकाल असा : पुरुष खुला गट : सिद्धेश पाटील (कोल्हापूर), चिन्मय केवलरामानी (गोवा), सूर्या थातू (पुणे), तेजस धांदे (नागपूर), जिम हॅन्डर्सन(इंग्लंड)

पुरुष मास्टर (३६-५० वयोगट)
विनायक गावकर (गोवा), अल्बिनो अल्बुकर्क (गोवा ), अनुप पवार (मुंबई), अर्जुन पाटील (मिरज), सतीश सावंत (पुणे).

पुरुष -सिनियर (५१+ वयोगट) –
प्रशांत तिडके (पुणे ), रिचर्ड म्युलर (जर्मनी), संतोष पवार (पुणे ), संजय सातपुते (पुणे ), मरियान डिसूझा (गोवा).

पुरुष – लहान मुले – साईराज भोईटे (सातारा), आर्यन जाधव (पलूस), राजवर्धन शिंदे (विटा), सुजल ओतारी(कोल्हापूर), करण बाळ खाडे (सातारा).

महिला – खुला गट – योगेश्वरी कदम (सांगली), साक्षी पाटील (सांगली), नेहा टिकम (पुणे), जुई नारकर (मुंबई), श्रावणी परीट (चिंचवड).

स्पर्धेत विट्याच्या ७ वर्षीय शिवतेज वांगणेकरने राजू मोमीन यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभार्ली घाट सर करून सर्वांत कमी वयाच्या रायडरची नोंद केली. मुंबईच्या आर्यन कुलवडे (वय १०) याने न थांबता सलग सायकल चालवत कुंभार्ली घाट सर केला.

७७ वर्षीय निरूपमा भावे व ७२ वर्षांचे गजानन भातडे यांनीदेखील कुंभार्ली घाट सर केला. या सर्वांना चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत पटवर्धन, सह्याद्री निसर्ग मित्रचे भाऊ काटदरे, डॉ. अब्बास जबले, विनती ऑरगॅनिक्सतर्फे श्री. ढगे साहेब, चिपळूण सायकलिंग क्लबचे डॉ. तेजानंद गणपत्ये उपस्थित होते.

डॉ. पटवर्धन म्हणाले की आजवरची सोनपात्रा मंदिर, कुंभार्ली घाट आणि त्यामधले खड्डे ही घाटाची ओळख पुसून चिपळूण सायकलिंग क्लबने या घाटाला नवीन ओळख दिली आहे. घाटातल्या सायकलिंगचे हे आव्हान पेलण्यासाठी देशविदेशातून रायडर्स येतात, हे या क्लबचै यश आहे. दरवर्षी शंभरहून अधिक रायडर्सची भर पडत आहे, हे बघता पुढच्या वर्षी चारसो पार नक्कीच होतील, अशा शुभेच्छा त्यांनी आपल्या मनोगतात दिल्या.

स्पर्धेला चिपळूण, लातूर, परभणी, मुंबई, पुणे व इतर भागातून सायकलप्रेमींनी मदत करताना स्पर्धा पार पडण्यासाठी आर्थिक बळ देऊ केले, त्याबद्दल या सर्व देणगीदारांबद्दल चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version