कुंभार्ली घाटाचा राजा राज्यस्तरीय सायकल स्पर्धा १६ एप्रिलला

चिपळूण : चिपळूण सायकलिंग क्लबने कुंभार्ली घाटाचा राजा स्पर्धेचे दुसरे पर्व येत्या १६ एप्रिल रोजी आयोजित केले आहे. स्पर्धा सकाळी ६ वाजता सुरू होईल.

ही स्पर्धा चिपळूणजवळील सह्याद्री पर्वतरांगांमधील निसर्गाने नटलेल्या अशा कुंभार्ली घाटातून पार पडणार आहे. स्पर्धेचे एकूण अंतर २९ किलोमीटर असून त्यातील घाटाचे अंतर सुमारे १२ किलोमीटरचे आहे. चढाची एकूण उंची ६५० मीटर, तर तीव्रता पाच टक्के आहे. महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांतील सायकलपटू बहुसंख्येने हा विशाल घाट सर करण्यासाठी येथे वारंवार येतात.

गतवर्षीच्या उत्कंठावर्धक स्पर्धेमुळे यावर्षी १५० स्पर्धकांनी आतापर्यंत स्पर्धेसाठी नावनोंदणी केली आहे. राज्य, राष्ट्रीय पातळीवरील नावाजलेले खेळाडू आणि दोन परदेशी सायकलस्वार कुंभार्ली घाट सर करण्यासाठी चिपळूणमध्ये दाखल होणार आहेत.

चिपळूण सायकलिंग क्लबची स्थापना २०२० साली झाली. क्लबतर्फे नवनवीन उपक्रम आयोजित केले जातात. कुंभार्लीचा राजा ही अशीच एक आगळी स्पर्धा गेल्या वर्षी आयोजित केली होती. स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. तेव्हा ८५ हून अधिक स्पर्धकांनी स्पर्धा गाजवली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत राज्यस्तरीय खेळाडूंनी अक्षरशः सेकंदाच्या फरकाने पहिले पाच नंबर पटकावले होते.

गेल्या वर्षीच्या प्रतिसादानंतर यावर्षी ही स्पर्धा एलिट, ४० वर्षांवरील वयोमर्यादेची मास्टर्स आणि महिला अशा तीन गटांत होणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, यासाठी बक्षिसांची रक्कम आणि बक्षिसांचे एकूण क्रमांक दहापर्यंत वाढवण्यात आले आहेत. तसेच स्पर्धेमध्ये एलिट कॅटॅगरीसाठी सरप्राइज स्प्रिंट (प्राइम) असे स्वतंत्र बक्षीसदेखील ठेवण्यात आले आहे. स्पर्धेतील बक्षिसांचे स्वरूप असे – एलिट (खुला गट) – पहिल्या १० विजेत्यांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार, ५ हजार, ३ हजार, २ हजार आणि प्रत्येकी एक हजाराची पाच बक्षिसे तसेच चषक.

मास्टर्स (४० पेक्षा जास्त वयोमर्यादा) तसेच महिला या दोन्ही गटांसाठी पहिल्या पाच क्रमांकांना बक्षिसे दिली जातील. त्यांचा अनुक्रम असा – ५ हजार, ३ हजार, २ हजार आणि प्रत्येकी एक हजाराची दोन तसेच चषक.फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील सायकलपटूंसाठी खास सोडतीमधून विशेष बक्षीस दिले जाईल.

नोंदणी केलेल्या स्पर्धकांची स्पर्धेच्या आदल्या दिवशी राहण्याची सोय केली जाईल. सामायिक हॉलमध्ये स्त्री आणि पुरुष यांना वेगवेगळी व्यवस्था असेल. गादी, उशी, पांघरूण देण्यात येईल. रात्रीच्या एका वेळच्या शाकाहारी जेवणाची सोय केली जाईल. स्पर्धेदरम्यान पाणी, केळी, चिक्की, ओआरएस पुरवले जाईल. स्पर्धेनंतर सर्वांना अल्पोपाहार देण्यात येईल. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्वाना आकर्षक पदक दिले जाईल. पूर्ण स्पर्धेचे व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी करण्यात येईल. स्पर्धदरम्यान पूर्ण वेळ रुग्णवाहिका सज्ज असेल.

चिपळूणमधील अनेक दानशूर व्यक्तींनी या स्पर्धेसाठी अर्थसहाय्य केले आहे. स्पर्धेचा शुभारंभ चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून केला जाणार आहे.

देशभरातून येणाऱ्या स्पर्धकांमधील थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनी १६ एप्रिलला सकाळी ठीक ५.४५ वाजता बहादूरशेख नाका येथे उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेनंतर माधव सभागृहात विजेत्यांना चषक आणि बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे.

स्पर्धेचे शुल्क, तांत्रिक माहिती आणि अधिक माहितीसाठी प्रसाद आलेकर (99212 52023), विक्रांत आलेकर (72760 37321), मनोज भाटवडेकर (94212 53153), श्रीनिवास गोखले (98817 70741), डॉ, स्वप्नील दाभोळकर (88880 56150) किंवा डॉ. तेजानंद गणपत्ये (99213 41122) यांच्याशी संपर्क साधावा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply