किंग ऑफ कुंभार्ली सायकल स्पर्धेत खुल्या गटात सिद्धेश पाटील विजेता

चिपळूण : चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे आयोजित किंग ऑफ कुंभार्ली ही देशभरातील ख्यातनाम सायकल स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडली. स्पर्धेत खुल्या गटात सिद्धेश पाटील विजेता ठरला.

सिद्धेश पाटील

अल्पावधीतच प्रसिद्धीचे शिखर गाठलेल्या या सायकलिंग स्पर्धेचे हे चौथे वर्ष होते. देशविदेशातून ३५० हून अधिक पाच गटांच्या या स्पर्धेत सायकलपटूंनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. यावर्षी प्रथमच ८ शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त सायकलपटू, ३३ राज्य/राष्ट्रीय खेळाडू, १५ हून अधिक आयर्नमन, ५ आशिया चॅम्पियनशिप खेळलेले खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.

चिपळूणचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते झेंडा दाखवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सर्व सायकलपटू कुंभार्ली घाटमाथ्याच्या दिशेने रवाना झाले. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी टाळ्या वाजवून सायकलस्वारांना प्रोत्साहित केले. हौशी ढोलपथकांच्या तालावर सायकलस्वारांनी पोफळीपर्यंत अत्यंत वेगाने मार्गक्रमणा केली. एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी लागलेल्या चुरशीने उपस्थितांच्या नजरेचे पारणे फेडले. पोफळी कमानीपासून सायकलपटूंचा कस बघणारी चढाई सुरू झाली आणि आत्तापर्यंत थोडे मागे थांबून आपली ऊर्जा राखलेल्या सायकलस्वारांनी बघता बघता त्या जत्थ्यातून आपल्या सायकली पुढे दामटल्या आणि इतर स्पर्धकांवर निर्विवादपणे वर्चस्व मिळविले.

बारा किमी खडी चढण असलेल्या कुंभार्ली घाटासाठी पुढे असणाऱ्या मोजक्या सायकलस्वारांमधेदेखील किंग ऑफ माउंटन या पारितोषिकासाठी चढाओढ होती. या संपूर्ण २९ किमीसाठी सुमारे ७५० मीटर्सपेक्षा जास्त उंची गाठत या सायकलस्वारांनी हे आव्हान यशस्वीपणे पेलले आणि हेही पारितोषिक पटकावले.

गटनिहाय प्रथम तीन सायकलस्वारांची नावे अशी :

10-17 किड्स –
प्रथम – आर्यन सुनील माळगे (१तास:११मिनिटे:१४सेकंद:३७२मिलीसेकंद)

द्वितीय – यश सागर देवकुळे (१तास:११मिनिटे:१४सेकंद:३७३मिलीसेकंद)

तृतीय – आर्यन संदीप जाधव (१तास:११मिनिटे:१४सेकंद:८७२मिलीसेकंद)

१२ किमी किंग ऑफ माउंटन – आर्यन सुनील माळगे (३९मिनिटे:२०सेकंद)

महिला खुला गट –
प्रथम – जुई गजानन नारकर (१तास:१५मिनिटे:४८सेकंद:३५४मिलीसेकंद)

द्वितीय – योगेश्वरी महादेव कदम (१तास:१९मिनिटे:४१सेकंद:३४०मिलीसेकंद)

तृतीय – राजनंदिनी सोमवंशी (१तास:१९मिनिटे:४१सेकंद:५६९मिलीसेकंद)

१२ किमी किंग ऑफ माउंटन – जुई गजानन नारकर (४३मिनिटे:५२सेकंद)

पुरुष सिनिअर गट –
प्रथम – महेश किणी (१तास:१६मिनिटे:०७सेकंद:८५३मिलीसेकंद)

द्वितीय – संतोष पवार (१तास:१७मिनिटे:१०सेकंद:५९५मिलीसेकंद)

तृतीय – आस्ताद पालखीवाला (१तास:१७मिनिटे:४३सेकंद:०८८मिलीसेकंद)

१२ किमी किंग ऑफ माउंटन – महेश किणी (४४मिनिटे:४६सेकंद)

पुरुष मास्टर्स गट –
प्रथम – राहूल शिरसाट (१तास:०९मिनिटे:५९सेकंद:९१८मिलीसेकंद)
द्वितीय – अनूप पवार (१तास:११मिनिटे:०३सेकंद:५९०मिलीसेकंद)
तृतीय – अर्जुन पाटील (१तास:११मिनिटे:०३सेकंद:५९०मिलीसेकंद)

१२ किमी किंग ऑफ माउंटन – राहूल शिरसाट (३८मिनिटे:१६सेकंद)

पुरुष खुला गट –
प्रथम – सिद्धेश अजित पाटील (१तास:०३मिनिटे:२९सेकंद:१९५मिलीसेकंद)
द्वितीय – सूर्या थातू (१तास:०३मिनिटे:२९सेकंद:९५५मिलीसेकंद)
तृतीय – निहाल मुसा नदाफ (१तास:०३मिनिटे:३१सेकंद:४६२मिलीसेकंद)
१२ किमी किंग ऑफ माउंटन – सिद्धेश पाटील (३४मिनिटे:३३सेकंद)

स्पर्धा संपल्यानंतर चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सर्व स्पर्धकांना गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभात चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सायकलपटूंचा श्री. निकम यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी चिपळूण डीवायएसपी श्री. राजमाने साहेब, विनती ऑरगॅनिक्सचे सुमेरजी तारे, एक्सेल इंडस्ट्रीजचे आनंद पाटणकर, डॉ. अब्बास जबले, डॉ. गोपीनाथ वाघमारे, पु. ना. गाडगीळचे मयूर सुर्वे, प्रथमेश नामजोशी, अनिरुद्ध निकम, प्रसिद्ध यू ट्यूबर महेश दाभोळकर, मेनेकी ॲबसोल्यूटच्या प्रीती गुप्ता, सह्याद्री क्लासिकचे डॉ. आदित्य पोंक्षे, काळकाई ॲग्रोचे नितिश पाटणे, सायक्लॉजिस्ट – पुणेचे अभिजित लोकरे, फय्याज सायकलचे अकिल सय्यद तसेच इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

सहभागी स्पर्धकांनी चिपळूण सायकलिंग क्लबच्या उत्कृष्ट आयोजनाबाबत भरभरून प्रतिक्रिया दिल्या तर अनेकांनी लवकरच ही देशातील अग्रगण्य सायकल स्पर्धा होईल, असा विश्वास व्यक्त केला.

चिपळूण सायकलिंग क्लब पर्यावरण रक्षणासाठी नेहमीच सजग असतो. त्यामुळे स्पर्धकांनी वापरलेल्या पाण्याच्या बाटल्या स्वयंसेवकांनी लगेचच गोळा केल्या. याकामी चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेची दरवर्षी मोलाची मदत होते. बाटल्या गोळा करणे, वाहतूक करणे आणि त्या रिसायकल करणे ही सर्व जबाबदारी सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेचे संस्थापक व ज्येष्ठ निसर्गमित्र भाऊ काटदरे आणि त्यांचे सर्व स्वयंसेवक आपल्या खांद्यावर घेतात.

चिपळूण सायकलिंग क्लबचे अध्यक्ष विक्रांत आलेकर यांनी सर्व देणगीदार, स्पर्धक, सह्याद्री निसर्ग मित्र, स्पर्धकांना शुद्ध पाणी वितरण करणाऱ्या चिपळूण तालुका स्पोर्ट्स अकादमीचे स्वयंसेवक तसेच चिपळूण सायकलिंग क्लबचे सर्व सभासद व स्वयंसेवक यांचे आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply