राज्यात १६ ठिकाणी युद्धसदृश परिस्थितीची रंगीत तालीम; रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचाही समावेश

रत्नागिरी : जम्मू-काश्मिरात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धसदृश परिस्थितीत करावयाच्या कृतीची रंगीत तालीम अर्थात मॉक ड्रिल करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील २५९, तर महाराष्ट्रातील १६ ठिकाणांचा यात समावेश असून, बुधवारी, सात मे रोजी हे मॉक ड्रिल केले जाणार आहे. यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचाही समावेश आहे. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)
युद्धसदृश किंवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी कोणती सतर्कता बाळगावी, तसेच प्रशासनाने कोणती पावले उचलावीत, या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील १६ ठिकाणांची तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या गटात अतिसंवेदनशील ठिकाणांचा समावेश असून, यामध्ये मुंबई, उरण आणि तारापूर या तीन ठिकाणांचा समावेश आहे. दुसऱ्या गटात ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-धाटाव-नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ वायशेत, पिंपरी-चिंचवड या ठिकाणांचा समावेश आहे. तिसऱ्या गटात छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी बुधवारी मॉकड्रिल घेण्यात येणार असून, नागरी संरक्षण यंत्रणांना त्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संभाव्य युद्धसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची खात्री करून घेणे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रत्नागिरीत पाच ठिकाणी मॉक ड्रिल
रत्नागिरी जिल्ह्यात सात मे रोजी सायंकाळी चार वाजता पाच ठिकाणी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी सायरन वाजवला जाणार असून, या कालावधीत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे.
ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम नियोजन आणि पूर्वतयारीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, सहायक उपनियंत्रक धर्मेंद्र जाधव, संबंधित विभागाचे अधिकारी आणि नागरी संरक्षण दलाचे जिल्हा उपनियंत्रक लेफ्टनंट कर्नल प्रशांत चतुर हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
रत्नागिरी तहसीलदार कार्यालय, रत्नागिरी रेल्वेस्थानक, राजापूर नगरपालिका, दापोली आणि संगमेश्वर तालुक्यातील एक ग्रामपंचायत येथे उद्या सायंकाळी चार वाजता ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. या वेळी आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, प्रथमोपचार या बाबी सज्ज असणे आवश्यक आहे. यामध्ये आपदा मित्र आणि नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक यांचा समावेश करावा. जिल्ह्यातील तालुकास्तरीय यंत्रणांनी आपले नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत. मत्स्यविभाग, बंदरे, मेरीटाईम बोर्ड, फिनोलेक्स, जेएसडब्ल्यू, अल्ट्राटेक आदी कंपन्या, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत औद्योगिक वसाहतीमधील महाविद्यालयांनी मॉक ड्रिल करून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्या. बैठकीच्या सुरुवातील निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी मॉक ड्रिलच्या अनुषंगाने संगणकीय सादरीकरण करून माहिती दिली.
सिंधुदुर्गातही होणार मॉक ड्रिल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारी ३ ते ३.२० या काळात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी, कणकवली या नगरपालिका क्षेत्रात, तर रात्री ८ ते ८.१५ या काळात देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागात वीज बंद करून ‘ब्लॅक आउट’ करण्यात येणार आहे. याबाबत कोणती काळजी घ्यावी, काय करावे, काय करू नये याची माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि प्रभारी पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी पत्रकार परिषदेत दिली. (फोटो/व्हिडिओ जाहिरातीच्या खाली)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply