तळेरे (ता. कणकवली): अक्षरोत्सव परिवार आणि श्रावणी कंप्युटर एज्युकेशनच्या संयुक्त विद्यमाने सलग चौथ्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तळेरे (ता. कणकवली) येथील अक्षरोत्सव परिवार आणि श्रावणी कंप्युटर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होणार आहे. तीन गटांत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त शालेय मुलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुलांना लेखनाची आणि सुंदर हस्ताक्षरची आवड निर्माण व्हावी, यासाठी दरवर्षी जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावी अशा तीन गटांत होणार आहे. यासाठी सुप्रसिद्ध कवी, अभिनेते आणि लेखक संकर्षण कऱ्हाडे यांच्या दोन कविता निवडण्यात आलेल्या आहेत.
स्पर्धेच्या माध्यमातून मुलांना लेखनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यातून सामाजिकता जोपासली जावी असा दुहेरी उद्देश ठेवून स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यामुळे सामाजिक संदेश मिळेल असे साहित्य लेखनासाठी दिले जाते. यावेळच्या दोन्ही कविता त्यात्या वयाच्या मुलांना वास्तव दर्शविणाऱ्या आहेत.
स्पर्धकांनी आपले साहित्य एफोर कागदावर लिहून त्यामागे स्पर्धकाचे पूर्ण नाव, पत्ता, शाळेचे पूर्ण नाव, इयत्ता, संपर्क क्रमांक लिहून १५ जुलैपर्यंत निकेत पावसकर, अक्षरोत्सव, तळेरे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे किंवा श्रावणी कंप्युटर एज्युकेशन, प्रज्ञांगण, महालक्ष्मी प्लाझा, खमंग हॉटेलजवळ, तळेरे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे आणून द्यावेत किंवा पोस्टाने पाठवावेत.
तिन्ही गटांतील प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेला उत्तम सुलेखन करणारे परीक्षक असतात. यापूर्वी झालेल्या स्पर्धेतील काही विजेत्यांनी अद्याप आपली पारितोषिके नेलेली नाहीत, अशा स्पर्धकांनी अवश्य संपर्क साधावा. या स्पर्धेबाबत अधिक माहिती आणि स्पर्धेच्या कवितांसाठी निकेत पावसकर (9403120156), श्रावणी मदभावे (7719858387) किंवा सतीश मदभावे (9405928865) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

