Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

आर्ट सर्कलतर्फे रत्नागिरीत ९-१० नोव्हेंबरला सांगीतिक मेजवानी

Advertisements

रत्नागिरी : सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देणार्‍या आर्ट सर्कलच्या वतीने ९ आणि १० नोव्हेंबर रोजी सांगीतिक कार्यक्रम आयोजित केला आहे.

९ रोजी “स्वरस्वप्न” हा गुरू स्वप्ना दातार यांच्या संकल्पनेतून साकारलेला व्हायोलिन वादनाचा कार्यक्रम, तर १० रोजी “स्वर आशा” हा आशा भोसले यांच्या चिरतरुण गाण्यांचा कार्यक्रम स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात सायंकाळी ७ वाजता सादर होणार आहे.

दि. ९ रोजी सायंकाळी ७ वाजता होणार्‍या “स्वरस्वप्न”च्या निमित्ताने व्हायोलिन वाद्यवृंद अनुभवायला मिळणार आहे. व्हायोलिन हे अत्यंत नाजूक आणि स्वराला संवेदनशील वाद्य! त्यामुळे ते शिकणे आणि त्याचे सादरीकरण करणे हे शिवधनुष्य पेलण्याहून कमी नाही. परंतु मेहनतीने ही नजाकतदेखील शिकता येते, याची प्रचीती देणारा हा सर्वांगसुंदर स्वरस्वप्न! गुरू स्वप्ना दातार यांच्या शिष्यांच्या वादनातून विविध राग, उपशास्त्रीय संगीत याचसोबत भाव आणि सिनेसंगीतदेखील या वाद्यवृंदामध्ये समाविष्ट आहे, त्यामुळे सर्वसमावेशक असा हा व्हायोलिन वादकांचा मेळा चित्त हरपून टाकतो. नुसतीच करमणूक हा या सादरीकरणाचा उद्देश नसून गुरू स्वप्ना दातार यांच्या अनुभवी शब्दांमधून या वाद्यवृंदाची निर्मितीप्रक्रिया, मुलांची केलेली जडणघडण, त्यांच्यावर झालेले वादनाचे संस्कार याबद्दलही अधिक आणि नवीन माहिती मिळत राहते. देशातच नाही तर विदेशातदेखील रसिक या मुलांच्या वादनाने, मंत्रमुग्ध झाले आहेत. शास्त्रीय संगीताची श्रीमंती आणि सिनेसंगीताची आकर्षकता एकाच वेळी स्वरस्वप्नमधून अनुभवायला मिळणार आहे. शास्त्रीय संगीतामधील दिग्गज कलाकारांनी या बालचमूचे कौतुक केले आहे. स्वरस्वप्नचा चकित करणारा अनुभव रसिकांना मिळणार आहे.

दुसर्‍या दिवशी, दि. १० रोजी आशा भोसले यांच्या गीतांचा नजराणा सोनाली कर्णिक, प्रीती जोशी आणि शमिका भिडे या तीन गायिका ‘स्वराशा’मध्ये सादर करणार आहेत. अमित गोठिवरेकर, प्रभाकर मोसमकर, सागर साठे, पंकज धोपावकर हे वादक गाण्याला साथसंगत करणार आहेत. अमित काकडे यांच्या अभ्यासपूर्ण आणि खुमासदार निवेदनाने कार्यक्रमाला अधिक रंगत येणार आहे. आशा भोसले यांची गीते म्हणजे हृदयाचा हळवा कप्पाच जणू…. भक्तिसंगीत- अभंगापासून ते पॉप म्युझिकपर्यंतचे सगळे गीतप्रकार आशाताईंनी त्यांच्या कारकिर्दीत गायले आहेत. त्यातील निवडक पण अद्वितीय गीते स्वराशामध्ये अनुभवता येणार आहेत.

या सांगीतिक कार्यक्रमासाठी आर्ट सर्कलच्या वार्षिक सभासद आणि सन्माननीय प्रायोजक यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. वार्षिक सभासद किंवा प्रायोजक नसलेल्यांसाठी देणगी मूल्य प्रवेशिका ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृहावर उपलब्ध होणार आहेत. या दोन दिवसीय सांगीतिक उपक्रमाला रसिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आर्ट सर्कलकडून करण्यात आले आहे.

स्वरस्वप्नचा बाल आणि युवा चमू.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version