रत्नागिरीत शुक्रवारपासून आर्ट सर्कलचा शास्त्रीय संगीत महोत्सव

रत्नागिरी : संगीत रसिकांना मेजवानी देणारा आर्ट सर्कल आयोजित संगीत महोत्सव शुक्रवार, दि. २४ जानेवारीपासून थिबा राजवाडा परिसरात रंगणार आहे.

पहिल्या दिवशी बंगलोरचे सुप्रसिद्ध गायक सिद्धार्थ बेलामनु महोत्सवाचा प्रारंभ करणार आहेत. प्रारंभी कर्नाटक शास्त्रीय संगीत आणि त्यानंतर गुरू पी. आर. मंजूनाथ यांच्याकडे उत्तर भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे घेत सिद्धार्थ यांनी आपल्या गाण्याला आकार दिला. ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याचे अध्वर्यू पं. विनायक तोरवेजींकडे गेली आठ वर्षं गुरुकुल पद्धतीने शिकत सिद्धार्थ पुढील प्रगती करत आहेत. रत्नागिरीचा वरद सोहनी सिद्धार्थ यांना संवादिनी साथ करणार आहे, तर प्रणव गुरव तबला साथ करणार आहे.

उद्घाटनाच्या दिवशी रात्री ८.३० वाजता संतूर वादक डॉ. शंतनु गोखले पहिल्या दिवसाचा समारोप करतील. कोवळ्या वयात तबला आणि संवादिनीचे मार्गदर्शन घेण्यास त्यांनी सुरुवात केली आणि कळत्या वयात त्यांना भुरळ घातली ती संतूर या वाद्याने. पं शिवकुमार शर्मा यांच्याकडे शिकण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्यांना रामदास पळसुले यांची तबला साथ लाभणार आहे.

दि. २५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध युवा व्हायोलिन वादक यज्ञेश रायकर आणि बासरीवादक एस. आकाश आपल्या सहवादनाने प्रारंभ करतील. वडील जगप्रसिद्ध व्हायोलिन स्वरप्राज्ञ पं. वादक मिलिंद रायकर यांच्याकडून व्हायोलिनचे तर गानसरस्वती किशोरी आमोणकर, आनंद पेडणेकर आणि कै. पं. वसंतराव कडणेकर यांच्याकडून कंठसंगीताचेही धडे यज्ञेश रायकर यांनी घेतले आहेत. तंतूवाद्यासोबत सहवादन आहे सुषीर वाद्य बासरीचे! संकेथी घराण्यात जन्मलेले बासरी वादक एस. आकाश यांच्यासोबत हे सहावादन रंगणार आहे. वयाच्या चौथ्या वर्षी सुप्रसिद्ध बासरीवादक पं व्यंकटेश गोडखिंडी यांच्याकडे बासरीचे धडे गिरवायला त्यांनी सुरुवात केली. पं. रोणू मुझुमदार यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर त्यांचे वादन अधिकाधिक बहरत गेले. या सहवादनाला पखवाजसाथ करणार आहेत रत्नागिरीचे गुणी वादक प्रथमेश तारळकर. तालयोगी पं सुरेश तळवलकर यांच्या तालमीत तयार होत प्रथमेश यांनी अल्पावधीतच स्वतःचे भक्कम स्थान निर्माण केले आहे. या सहवादनाला तबला साथ विवेक पंड्या करणार आहेत.

महोत्सवाच्या दुसर्‍या दिवसाचा समारोप बंगलोरच्या शास्त्रीय गायिका विदुषी भारती प्रताप करतील. आग्रा घराण्याच्या भारती प्रताप आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. गुरू मारुतीराव इनामदार, पं. रामाराव व्ही. नाईक यांच्याकडे मार्गदर्शन घेतल्यावर गेला काही काळ आग्रा घराण्याच्या अध्वर्यु विदुषी ललित जे. यांच्याकडे शिक्षण सुरू आहे. विदुषी भारती यांना पं. अजय जोगळेकर संवादिनी साथ तर बेंगलोरचे योगीश भट तबला साथ करणार आहेत.

दि. २६ जानेवारी रोजी उस्ताद अल्लारखाँ यांचे शिष्य आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचे गुरुबंधू पं योगेश समसी यांच्या तबला सोलोने शेवटच्या दिवसाची सुरुवात होणार आहे. वडील पं. दिनकर कैकिणी यांच्याकडून वयाच्या चौथ्या वर्षीपासून तबल्याचे धडे घ्यायला त्यांनी सुरुवात केली. पं एच. तारानाथ राव यांच्याकडून पुढील धडे घेतल्यानंतर साक्षात ताल मानले जाणारे उस्ताद अल्लारखाँ यांच्या मार्गदर्शनाखाली तबल्यावर प्रभुत्व मिळवायला सुरुवात केली. उत्तम संगतकार आणि उत्तम एकल वादक असा दुर्मिळ संयोग संगीत महोत्सवात योगेशजींच्या निमित्ताने रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यांच्यासोबत पुण्याचे मिलिंद कुलकर्णी संवादिनीवर लेहरासाथ करणार आहेत.

हुबळीचे सुप्रसिद्ध गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांनी एक दशकाहून अधिक काळ पं अर्जुनसा नाकोद यांच्याकडे गाण्याची तालीम घेतली. त्यानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशींचे शिष्य पं. श्रीपती पडिगर यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. पं. भीमसेन जोशी यांच्या गायकीची आठवण करून देणार्‍या त्यांच्या गायकीने महोत्सवाचा समारोप होणार आहे. त्यांना यशवंत वैष्णव तबला साथ तर अजय जोगळेकर संवादिनीसाथ करणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी महोत्सवाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आर्ट सर्कल फाउंडेशनने केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply