ई-यंत्रण उपक्रमाला रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद; खेडशीत प्रातिनिधिक स्वरूपात झाले उद्घाटन

रत्नागिरी : ‘आजच्या काळात तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणेही लवकर बदलावी लागत आहेत. म्हणूनच ई-वेस्ट अर्थात इलेक्ट्रॉनिक कचरा तयार होण्याचे प्रमाण मोठे आहे. ई-कचऱ्याच्या निर्मितीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. त्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्यास किंवा पुनर्वापर न केल्यास हवा, पाणी आणि जमिनीचे प्रदूषण होते. म्हणूनच ई-यंत्रण हा ई-कचरा संकलनाचा उपक्रम राबवण्यात आला आहे,’ असे प्रतिपादन पुण्यातील पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन या संस्थेच्या दक्षता परब यांनी आज (२६ जानेवारी) रत्नागिरीत केले. ई-यंत्रण उपक्रमाचे रत्नागिरीतील उद्घाटन खेडशीतील श्रीनगर येथील अनुश्रुती एंटरप्रायझेस-पितांबरी शॉपीमध्ये झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. रत्नागिरीत हा उपक्रम राबविण्यासाठी अनबॉक्स युवर डिझायर या संस्थेने पुढाकार घेतला आहे. (परब यांनी दिलेल्या माहितीचा व्हिडिओ, तसेच उपक्रमाचे फोटोज बातमीच्या शेवटी दिले आहेत.)

उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित नागरिक

प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने पुण्यातील पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनने अन्य संस्थांच्या मदतीने महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधल्या एकूण वीस शहरांमध्ये ई-यंत्रण हा ई-कचरा संकलनाचा उपक्रम राबवला. त्यासाठी सातशेहून अधिक ठिकाणी संकलन केंद्रे तयार करण्यात आली होती. रत्नागिरीत हा उपक्रम राबविण्यासाठी अनबॉक्स युवर डिझायर या संस्थेच्या गौरांग आगाशे यांनी पुढाकार घेतला. रत्नागिरी शहराच्या विविध भागांमध्ये १५ संकलन केंद्रे होती. त्यांपैकी खेडशीच्या केंद्रावर प्रातिनिधिक स्वरूपात या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे आणि मकरंद पटवर्धन यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अनुश्रुती एंटरप्रायझेसचे कोनकर कुटुंबीय, तसेच श्रीनगर आणि खेडशी परिसरातील नागरिक, तसेच फोटोग्राफर पराग हेळेकर उपस्थित होते. संकलन केंद्राच्या माध्यमातून या पर्यावरणविषयक कार्यात सहभागी होता आल्याबद्दल अनिकेत कोनकर आणि कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला.

मनोगत व्यक्त करताना गौरांग आगाशे

शहरातील सर्वच केंद्रांवर ई-कचरा संकलनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. ई-कचरा आणून देणाऱ्यांना ‘अनबॉक्स’तर्फे कुपन देण्यात आले. ‘अनबॉक्स’कडून गेल्या वर्षापासून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी घरी येऊन प्लास्टिक संकलन केले जाते. आता त्या उपक्रमांअंतर्गत ई-कचऱ्याचेही संकलन केले जाणार आहे, अशी घोषणा गौरांग आगाशे यांनी केली. शहरातील सर्व स्वयंसेवक आणि संकलन केंद्रांनी, तसेच नागरिकांनी यात सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य केल्यामुळे उपक्रम यशस्वी झाल्याची भावना व्यक्त करून आगाशे यांनी सर्वांचे आभार मानले.

पुण्यातील पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन ही शाश्वत जीवनशैलीवर काम करणारी संस्था आहे. सणासमारंभाच्या निमित्ताने आपण घरात स्वच्छता करतो, त्या वेळी वापरल्या न जाणाऱ्या किती गोष्टी घरात आहेत, याचा अंदाज येतो. असा इलेक्ट्रॉनिक कचरा संकलित करून तो रिसायकल (पुनर्वापर) करणाऱ्या अधिकृत कंपन्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनतर्फे केले जाते, अशी माहिती दक्षता परब यांनी दिली. मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल परब यांनी रत्नागिरीकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि सर्व जागरूक नागरिकांनी हा उपक्रम असाच पुढे न्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. (परब यांचा व्हिडिओ आणि उपक्रमाच्या फोटोजचा स्लाइडशो सोबत दिला आहे.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply